याच न्यायाने आपल्या साहित्यात उदात्त विचार व्यक्त करणारे कवी ,लेखक वैय्यक्तिक पातळीवर तसे उदार वर्तन करताना दिसले पाहिजेत, पण बऱ्याच वेळा तसे आढळत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर एका अतिशय नावाजलेल्या कवींना एका  सामाजिक  संस्थेने  आपल्या  एका समारंभासाठी बोलावले. त्या कविमहाशयांनी त्यासाठी बरीच मोठ्ठी  बिदागी तसेच विमानाचे  तिकिट व पंचतारांकित  होटेलमध्ये  वास्तव्य अशा अटी घातल्या.शिवाय ते आपली मुलगी व जावई यांना घेऊन येणार म्हणजे त्याचाही खर्च संस्थेलाच करावा लागणार. त्यावर कडी म्हणजे पुढे कवींच्या जावयाला एका कंपनीत बरीच उच्च पदावर नोकरी असल्यामुळे कवी व त्यांच्या गोतावळ्याची राहण्याची व्यवस्था  त्या कंपनीने केली तेव्हां   पंचतारांकित होटेलमध्ये आपली व्यवस्था संस्थेस करावी लागणार नाही म्हणून बिदागीबरोबर त्या भाड्याचीही  रक्कम आपल्याला मिळावी  अशी मागणी कवीमहाशयांनी केली. हे ऐकून त्या कवीविषयी माझा आदर पूर्णच नष्ट झाला.
      दुसऱ्या एका आपल्या साहित्यातून नैतिक वर्तनाचे धडे वाचकांना देणाऱ्या लेखक महोदयांनी ( हे साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते) आपल्या मुलाच्या लग्नात हुंडा तर घेतलाच पण वधुपक्षाकडून पाय धुवून घेण्यापासून सगळे विधी करवून घेतले.