एका लेखाच्या ठराविक शब्दमर्यादेत अशोककुमारांचं कर्तृत्व मावण्याजोगं नाहीच. दोनअडीजशे चित्रपटांची नावं लिहू गेलं तर कंटाळवाणी जंत्री होणार. पण ममता, गुमराह, भीगी रात, आरती हे आणि असे अनेक चित्रपट (म्हणजे त्यांतले अशोक कुमार)स्मरणात रहाण्याजोगेच होते.

त्या काळात असं म्हटलं जायचं की दिलीप कुमार हा त्या त्या भूमिकेत शिरून अभिनय करतो. या पठडीमध्ये पूर्ण एकाग्रता आवश्यक असते शिवाय जी भूमिका आपण करतो आहोत तीच जगतो आहोत असं वाटू लागून प्रचंड तणाव येतो. ही पठडी श्रेष्ठ मानावी या मताचे काही लोक असत. याविषयी अशोक कुमार यांना  विचारलं असता त्यांनी हे मत उडवून लावलं होतं. त्यांच्या म्हणण्याचा आशय (जो आठवतो तो) असा होता की हे भूमिकेत शिरणं बिरणं टु सम एक्स्टेंट ठीक आहे पण प्रत्यक्षांत कोणतीही भूमिका वठवताना ते अलिप्त असतात. ते पात्र कसं बोलेल, वागेल याचं एक तटस्थ चिंतन त्यांच्या मनात चाललेलं असतं. थोडक्यात, अभिनयात वैचारिक भाग अधिक आणि भावनिक भाग कमी असतो, असावा.

अशोक कुमारचं आणखी एक आवर्जून नोंद घेण्याजोगं कर्तृत्व म्हणजे बाँबे टॉकीज च्या पडत्या काळात सावकशेठ वाच्छा च्या भागीदारीत चित्रपटनिर्मितीक्षेत्रात उतरून बाँबे टॉकीज ला दिलेली थोडीफार संजीवनी. निर्माता या संज्ञेची व्याप्ती केवळ पैसे ओतणारा माणूस एवढ्यापुरतीच मर्यादित त्या काळात आणि विशेषतः बाँबे टॉकीज च्या संदर्भात नव्हती. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात बाँबे टॉकीज चं एक खास स्थान आहे.सुशिक्षित आणि ध्येयप्रेरित लोकांनी निर्माण केलेला हा संस्थात्मक वारसा जपण्यासाठी त्यांनी केलेल्या  प्रयत्नांचं मोल खूप मोठं आहे. अर्थात या प्रयत्नांत ते फारसे यशस्वी झाले नाहीत किंवा फारच थोड्या प्रमाणात यशस्वी झाले ही गोष्ट वेगळी.

लेख वाचनीय आहे. स्मरणरंजन हे साहित्यमूल्य कधीच टाकाऊ ठरत नाही बहुधा. इंद्रायणीच्या डोहात बुडवलेल्या गाथ्यासारखं पुन:पुन्हा उसळी मारून वर येतं आणि तगून रहातं.        बहुधा.

जाता जाता : अशोक कुमारांचं संबोधन दादामणी (बंगालीत दादा मोणि) असं होतं का? अंबरीश मिश्र यांनी बहुधा याविषयी काही लिहिलं आहे आहे त्यांच्या एका पुस्तकात.