मुळात हा शब्द मराठी नसल्यामुळे त्याचे "शुद्ध"लेखन विवादास्पद आहे.
"मुळात" हा शब्द इथे 'ओरिजिनली' ह्या त्याच्या मूळ व स्वीकृत अर्थाने वापरला आहे. तो मराठी झालेला नाही असे मला अजिबात म्हणायचे नाही. तसे म्हणणे हास्यास्पद ठरेल. त्याला पर्यायी मराठी शब्द माझ्या तरी ऐकिवात नाही. तो कसा लिहावा- आयस्क्रीम/आइस्क्रीम/आईस्क्रीम - ह्यावर चर्चा चालली होती. माझा मुद्दा असा आहे की अद्याप मराठीत ह्या शब्दाचा एकच एक प्रमाण उच्चार नाही. हे तिन्ही उच्चार प्रचलित आहेत. मी तर अनेकदा एकाच माणसाला वेगवेगळ्या वेळी हे तिन्ही उच्चार आलटून पालटून वापरताना ऐकलेले आहेत. असे असताना कोणते रूप "शुद्ध" हे कोण, कसे, कोणत्या निकषांनुसार ठरवणार? ही चर्चा इंग्रज अमदानीत झाली असती तर एव्हाना ब्रिटिश उच्चारानुसार 'आयस्क्रीम' रूढ झाला असता. पण इंग्रजांना मायदेशी जाऊन बराच काळ व पिढ्या लोटल्या. आज भारतात बोलल्या जाणार्या इंग्रजीच्या उच्चाराचे मूळ शोधणे हे ऋषीचे कूळ शोधण्याइतकेच अवघड आहे. (सलमान खानाची इंग्रजी 'ऍक्सेंट' ह्या भूतलावर नक्की कुठे उगम पावली हे कोणीतरी ह्या पामराला सांगाच
! )
हे सर्व टेबल, खुर्ची, कपाट, दप्तर, मेज ह्या शब्दांना लागू होत नाही कारण त्यांच्या उच्चारणात संदिग्धता नाही. त्यामुळे त्यांचे "शुद्ध" स्वरूप सर्वमान्य आहे. टेबलला कोणी टबले, टबल, टेब्ल, किंवा तेबल म्हणत नाही; मेजाला मैज वा मोज म्हणत नाही. कपाट कपाटच असतं, कपात नाही.