कुठल्याही आदरणीय वाचकाला रेकी थोतांड/अन्धश्रद्धा आहे अशी नुसती शंका / १००% खात्री असेल, तर त्यानी माझे लेख वाचू नयेत अशी माझी त्याना नम्र विनंती आहे. प्रत्येकाला आपापले मत बाळगण्याची व मांडण्याची पूर्ण मुभा आहे. मला कोणाचेही मतपरिवर्तन करण्याची इच्छा नाही. पण प्रतिसाद आलाच आहे तर प्रतिवाद करण्याचा प्रयत्न करते.

रेकीप्रणाली १९२१मध्ये जपानमध्ये विकसित झाली, त्यामुळे ती "नवीन" अशी अजिबात नाही. रेकी म्हणजे वैश्विक प्राणशक्ती. भारतीय सन्स्कृतीत शक्तीसाधना मातृरूपात केली जाते. त्यामुळे बरेचसे भारतीय रेकीसाधक "रेकीमाता" असे म्हणतात. पाश्चिमात्य रेकीसाधक नुसतेच "रेकी" असे संबोधतात.

मी रेकी व बाळंतपण असा बादरायण संबंध दाखविलेला नाही. जेव्हा रेकीध्यानामुळे माझा स्वताचा भौतिक विकास व्हायला मदत झाली तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला ( बॅन्केतील ताई ) मदत करण्याची संधीही मिळाली, एव्हढेच मला म्हणायचे होते.

रेकीप्रणालीचा उगम अथर्ववेदात आहे आणि तिचे बरेचसे तत्त्वज्ञान सन्स्कृतोद्भव आहे. भारतीय सन्स्कृतीचा एक पैलू म्हणून मी ही लेखमाला "सन्स्कृती" ह्या सदराखाली लिहीते. ही लेखमाला पूर्ण करून भारतीय सन्स्कृतीला आदरांजलि वहावी, असा माझा माफक हेतू आहे.

तरीही आदरणीय वाचक माझी "रेकीवरील लेखमाला छापू नये" अशी विनंती मनोगत प्रशासनाला करून माझा बहुमूल्य वेळ वाचवू शकतात.