सूचना फारच भाबडेपणाची वाटते. एक तर ती मुळीच नावीन्यपूर्ण वगैरे नाही. अशा तऱ्हेच्या सूचना बरेच वेळा अधून मधून डोके वर काढत असतात. त्यातला अव्यवहारीपणा पुन्हा पुन्हा पटवून देत बसण्यापेक्षा लोक सरळ दुर्लक्ष करतात.
एव्हढ्या सगळ्या गच्च्यांवरचे पाणी साठवायचे कुठे? त्यासाठी जागोजागी जलाशय बांधावे लागतील. ती जागा कुठून आणायची? बरे हे पाणी पिण्यायोग्यही नसणार. म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नलिकाव्यवस्थेशी त्याचा संपर्क येता नये. नाही तर सारेच पाणी दूषित व्हायचे. इमारतींमध्येच एक तर ते साठवण्याइतकी जागा नसणारच पण समजा जागा असली तरी असे साचलेले पाणी काही महिन्यांनंतर (कारण पावसाळ्यात झाडे शिंपण्यासाठी वगैरे वापरण्याची गरजच नसते.)वापरण्याजोगे तरी राहील का? पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी वापरायचे झाल्यास वेगळी नळव्यवस्था, वेगळा पंप अशी साधने लागतील. बहुमजली इमारतींमध्ये अश्या प्लंबिंग चा खर्च किती येईल? मुंबईत साधारणपणे सत्तर बहात्तर इंच पाऊस पडतो.हिशोबासाठी सहा फूट पकडू या. दोन हजार चौ. फू. गच्चीवरचा हा पाण्याचा सहा फुटी स्तंभ किती लोकांना किती दिवस पुरेल? ह्या गच्चीखाली समजा चार मजल्यांवर मिळून प्रत्येकी पाचशे चौ.फू. च्या सोळा सदनिका आहेत. एक घनफूट म्हणजे साधारणतः २.८ लिटर पाणी होते.प्रत्येक सदनिकेमागे दररोज चारशे लिटर पाण्याचा वापर धरला तर हे पाणी त्यांना पाच दिवस पुरू शकेल. चारापेक्षा जास्त मजले असतील तर सदनिकांची संख्या जास्त होऊन त्यांना हे पाणी आणखी कमी दिवस पुरेल. वर्षातून फक्त तीन चार दिवस वापर होत असेल तर जलवाहिन्यांचा खर्च कोण कशाला करेल?