अब्जावधी वर्षांपूर्वी जेव्हा महाविस्फोट (बिग बँग) झाला तेव्हा अनंत मूलकण व प्रचंड महाऊर्जा निर्माण झाली. तापमान कमी होत जाऊन पृथ्वी, इतर ग्रह, तारे अशी आपण अनुभवतो ती सृष्टी तयार झाली. पण मग त्या अनंत मूलकणांचे व महाऊर्जेचे मिळून टोमॅटो सूपसारखे रसायन का बनले नाही? पृथ्वी, ग्रह अशी जड वस्तुमाने कशी तयार झाली?
ह्या प्रश्नाचे उत्त्तर देण्यासाठी प्रोफेसर हिग्ग्ज ह्यानी हिग्ग्ज क्षेत्राचा सिद्धान्त मांडला. त्याच्यानुसार विश्व हे हिग्ग्ज क्षेत्रात विसावलेले आहे. ज्या मूलकणांचा ह्या हिग्ग्जक्षेत्राशी ज्या प्रमाणात संपर्क आला तितक्या प्रमाणात त्यांचे वस्तुमान वाढून सांप्रतचे विश्व निर्माण झाले.
आता हे हिग्ग्ज क्षेत्र खरेच आहे का, हे निश्चित करण्यासाठी हा महाप्रयोग करण्यात आला. पंखा लावला की आपल्याला हवा आहे, याची संवेदना होते. त्याप्रमाणे प्रोटॉन्सचे महा आघात करून अल्पजीवी हिग्ग्ज बोसॉनच्या सह्या (हिग्ग्ज बोसॉन ज्या मुलकणांत विलय पावतो त्यांच्या सिग्नेचर्स) मिळविण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक विधान केले आहे की आम्हाला हिग्ग्ज बोसॉन असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
गॉड पार्टीकल हा शब्द लीऑन लेडरमन ह्या भौतिक शास्त्रज्ञानी आपल्या "गॉड पार्टीकल, इफ युनिव्हर्स इस द आन्सर, व्हॉट इज द क्वेश्चन? " ह्या पुस्तकाच्या शीर्षकात योजला. पण शास्त्रज्ञ हिग्ग्ज बोसॉन हाच शास्त्रीय शब्द वापरतात. अधिक माहितीकरता हे दुवा क्र. १ संस्थळ पहावे.