आज माध्यमक्रांतीमुळे सर्वसामान्यांच्या हाल-अपेष्टांवर लक्ष केंद्रित होत आहे ही चांगली गोष्ट असली तरी हे हाल स्वातंत्र्यपूर्व काळातल्यापेक्षा निश्चितच कमी आहेत हे लोकांच्या नजरेसमोर येत नाही. वीज, दूरध्वनी, दूरचित्रवाणी,शीतकपाट हे तर जाऊ द्याच पण रस्ते, रेल-गाड्या, शाळा, महाविद्यालये हेही त्या काळी नव्हते. कोस कोस पायी प्रवास नित्याचा होता. सर्वत्र दूषित पाणी, रोगराई, आधुनिक वैद्यकीचा आणि औषधांचा अभाव, गरोदरपणात आणि बाळंतपणात बायकांचे मरणे हे सररास होते. (आणि लगोलग पुरुषांनी दुसरे लग्न करणे हेही.)वाटीभर ताकाला किंवा लोणच्याच्या फोडीला लोक मोताद होते. आज फोफावलेला मध्यमवर्ग जवळपास नव्हताच. सर्वत्रच वीज नसल्यामुळे सर्व कामे सूर्यास्ताआधी घाईगडबडीने उरकून घ्यावी लागत. नैसर्गिक विधीसाठी काळोखातच लांब जावे लागे. आज हेमलकसा, गडचिरोलीमध्ये जी परिस्थिती आहे, तशी किंचित सौम्य प्रमाणात सर्वत्र होती.
शेतकऱ्याच्या शेतमालाला किंमत नव्हती. स.गो.बर्व्यांचा म्हणून एक किस्सा ऐकला आहे. त्यांना एकाने विचारले, पूर्वी दोन आण्यांना टोपलीभर पेरू मिळायचे. आता एवढे महाग का? त्यावर ते म्हणाले होते; ' विचार करा, ते टोपलीभर पेरू झाडावरून उतरवून दूर शहरात डोईवरून आणून विकल्यानंतर त्याला फक्त दोन आणेच मिळायचे आणि डाळतांदूळ,लाकुडफाटा,कपडालत्ता हे जरी स्वस्त असले तरी त्याला त्या दोन आण्यात परवडणारे नव्हते.' मुळात कृषि-उत्पादन कमीच होते. असे पुष्कळ लिहिता येईल.
आज मोलकरणींच्या हाताला घड्याळ आणि कानाला सेल-फोन असतो. घरातले शिळेपाके अन्न अथवा जुनेपाने कपडे त्या स्वीकारीत नाहीत.मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत पाठवतात. त्यांना डब्यात व्यवस्थित 'बेकफास' देतात. टी. व्ही वर अथवा एकमेकांचे बघून चांगलाचुंगला स्वयंपाक करतात. दूधदुभत्याचे, लोणच्याचे अपरूप त्यांना आता राहिलेले नाही. बाजारात त्यांना परवडेल अशा प्रमाणातल्या आकारमानात तयार जिन्नस उपलब्ध असतात.
आज शिक्षणामुळे म्हणा किंवा छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सुळसुळाटामुळे म्हणा लोकांमध्ये आपल्या हक्कांची जाणीव तसेच अन्यायाविरुद्धचा संताप तीव्र झालेला दिसतो. इतका, की पदरात पडलेले फायदेही त्यांच्या लक्षात येत नाहीत. अपेक्षा वाढलेल्या असल्यामुळे हे फायदे नगण्य आहेत असेच त्यांना वाटत राहते. पूर्वीच्या अपेक्षा पूर्ण झाल्यावर नवनव्या अपेक्षा बाळगण्याची इच्छा धरता येणे हा एक प्रकारे आपल्या लोकशाहीचा विजय आणि झालेल्या प्रगतीचा दाखलाच आहे.
भारतीय प्रजासत्ताक चिरायू आणि अधिकाधिक समृद्ध होवो.