जुन्या सदस्यांचे लेखन कमी होत जाणे हे बहुतेक सर्वच संकेतस्थळांवर होते. बहुतेक स्थळांवर त्यांची जागा भरून काढणारे नवीन लेखक येतात. मनोगतावर असे झाले नाही. उलट लेखकांची नवीन पिढी मनोगताला वळसा घालून इतर संकेतस्थळांकडे गेली. त्यामुळे इथे एक प्रकारचा साचलेपणा आला आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे त्याची कारणे अशी.

१.  २००७ मध्ये सुरू झालेल्या संकेतस्थळाच्या मालकांनी आधी आपल्या अनुदिनीवरून आणि नंतर त्या संकेतस्थळावरून मनोगताची आणि त्याच्या प्रशासकांची अर्वाच्य भाषेत बदनामी केली.

२. मनोगताच्या प्रशासकांचा शुद्धलेखनाबद्दलचा आग्रह -  हा मला व्यक्तिशः पटतो आणि प्रशासकांनी त्या कामासाठी शुद्धिचिकित्सक तयार करून मोठेच काम केले आहे त्याबद्दल आदरही आहे. खरे तर शुद्धलेखनाचा आग्रह धरणारे एकमेव संकेतस्थळ ही मनोगताची ओळख झाली आहे. तरीही या आग्रहामुळे किमान एक चांगला कथाकार मनोगत सोडून गेला आणि मी विनंती करूनही मनोगतावर परत आला नाही यावरून हा आग्रह जाचक ठरतो आहे का याचा विचार करायला हवा.

३.  काही वर्षांपूर्वी मनोगतावर अनुमतीशिवाय लेखन प्रसिद्ध होत नसे.

४. इथे "ब्राह्मणी" वातावरण आहे असा समज आहे.  खरे तर सर्वसाक्षींनी म्हटल्याप्रमाणे इथले वातावरण सभ्य आहे आणि ते तसे असावे यासाठी प्रशासक दक्ष आहेत ही भूषणस्पद बाब आहे. पण नेमकी हीच बाब काही घटकांना खटकत असावी.

५. नवीन संकेतस्थळे सुरू झाली. त्याची झळ मनोगतासारखीच उपक्रमालाही बसली आहे आणि तिथेही साचलेपणा आला आहे. पण तरीही जुने लेखक टिकवून ठेवून नवीन लेखकांना आकर्षित करणे मनोगताला अशक्य नसावे.

ही मला वाटलेली कारणे. इतरांनी त्यात भर घालावी. कारण आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. मनोगत सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे.

विनायक