मनोगतावर लिहिणाऱ्यांपैकी फारच थोडे लोक ’लेखक’ म्हणण्याच्या योग्यतेचे आहेत.
इतरत्र लिहिणारे तरी असे किती साहित्यसम्राट आहेत? मीराताई, मराठी आंतरजालावर लिहिणारे ९९.९९% तुमच्या-माझ्यासारखे हौशे-गवशे-नवशे आहेत. परंतु इतर काही मराठी जालचावड्यांवर मनोगताला जय महाराष्ट्र केलेले कितीतरी जण उत्साहाने वर्षानुवर्षे कळफलक बडवताना दिसताहेत. त्यांची प्रतिभा, त्यांची बहुप्रसवा लेखणी आटता आटत नाही. त्यामुळे केवळ हौस फिटली हे कारण म्हणता येणार नाही. तसे असते तर त्यांनी मनोगतावरच काय, कुठेच लेखन केले नसते.

बाकी, संस्थळांची संख्या, व त्यामुळे पर्याय वाढले आहेत हे बरोबर आहे. परंतु नियमितपणे मनोगतावर असणारे, लिहिणारे आता नियमितपणे दुसऱ्या एखाद्या संस्थळावर पडीक का असतात, तेथे जाऊन मनोगताला प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे नावे का ठेवतात, शिमगा का करतात ह्याचाही विचार करायला हवा.