इतक्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करण्यासाठी मनोगतावर रेंगाळावे असे काही उरले आहे असे वाटत नाही. प्रशासन प्रयत्न करत असेल पण जर प्रशासनाचा सूर "एक घाव दोन तुकडे" असेल तर अपेक्षित परिणाम साधला जात नाही हे एव्हाना स्पष्ट झाले आहे तेव्हा इतके प्रश्न विचारून जैसे थे स्थिती राखण्यापेक्षा प्रशासनाने आपल्या धोरणांचा पुनर्विचार करावा किंवा ती (बदललेली) धोरणे, त्यांचे उद्दिष्ट वगैरे दर्शनी जागी दिसतील अशी सोय करावी किंवा सदस्यत्व घेताना दिल्या जाणाऱ्या सूचनांमध्ये त्यांची भर करावी.*
"आप कतारमें है", "ग्रेसफुल ग्रेस", "हॅपीली एवर आफ्टर! " वगैरे शीर्षकांना विशिष्ट संदर्भ असतो. त्याला सुयोग्य किंवा इतर कोणताही पर्याय असणे शक्य नाही. तो अनुक्रमणिकांमधून काढला तर वाचकाला तो संदर्भ लक्षात घेऊन लेखावर टिचकी मारायची इच्छा तर व्हायला हवी ना. जर संपूर्ण लेख इतर भाषेतील शब्दांनी सजला असेल तर प्रशासनाचा विरोध पूर्ण मान्य आहे. त्यावर अनेक सदस्य सहमतीच दर्शवतील.
मनोगताने आपल्या धोरणांनी लेखक आणि वाचक दोघांनाही निराश केले आहे असे खेदाने म्हणावे लागते. अनेक लेख मनोगतावर शून्य प्रतिसादांची झूल मिरवत असतात त्यामागील कारणे प्रशासनाने कधी लक्षात घेतली आहेत काय?
* मी सदस्यत्व ५ वर्षांपूर्वी घेतल्याने पुढे अशा काही सूचना दिल्या गेल्या असतील तर कल्पना नाही.