सर्वप्रथम प्रशासक आणि मनोगती यांचे सहभागाबद्दल आभार.
या पानावरील गेल्या साडेपाच महिन्यांच्या कालावधीतील समस्त चर्चाप्रस्तावांपैकी केवळ तीन प्रस्तावांवर दोन आकडी चर्चा सहभाग मिळाले आहेत (हा धरुन) आणि यापैकी सर्वाधिक सहभागाची चर्चा 'असे का' हीच दिसते.
म्हणजेच हा विषय अजूनही मनोगतींच्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा असावा असे मी तरी सकारात्मकतेने समजतो, न पेक्षा या प्रस्तावाकडेही उदासीनतेनं पाठ फिरविली गेली असती. जर अशा एखाद्या चर्चेत सहभागी होणारे मनोगती आहेत आणि प्रत्येक प्रतिसाद तात्काळ प्रसिद्ध केला गेला आहे तर त्याचा अर्थ अजूनही मनोगत पुन्हा पहिल्यागत जोम धरू शकेल का? कदाचित काही कटू अनुभवांअंती प्रशासकांनी प्रसिद्धीपूर्व तपासणीची पद्धत लागू केली असावी आणि जेव्हा त्याची गरज नाही असे भासले तेव्हा पुन्हा ती शिथिल केली असावी. साहित्य वा प्रतिसाद यांचा ओघ आणि दर्जा अर्थातच महत्त्वाचा. नुसते भरमसाठ प्रतिसाद आले म्हणजे ती साहित्यकृती श्रेष्ठ ठरत नाही, वा ते संस्थळही महान ठरत नाही. किंबहुना हिणकस वा निरर्थक प्रतिसादांपेक्षा मोजके पण प्रामाणिक प्रतिसाद महत्त्वाचे.
संस्थळाचे धोरण काय असावे हा सर्वस्वी मालक-चालक यांचा अधिकार आहे आणि कोणत्या प्रकारच्या संस्थळावर रमावे हा सदस्यांचा अधिकार आहे. या चर्चेत मी नम्रपणे नमूद करू इच्छितो की कोणत्याही प्रकारे मनोगतची तुलना अन्य कोणत्याही संस्थळाशी करत नाही. मनोगतची मी केलेली तुलना ही आधीच्या मनोगताशी आहे.
प्रशासकांविषयी मला पूर्ण आदर आहे जेव्हा प्रत्येक लेखन हे विलंबाने प्रसिद्ध होत होते तेव्हा सुद्धा केवळ माझ्या विनंती व्यनिला मान देऊन प्रशासकांनी लेख प्रसिद्ध केल्याचे मला स्मरते (एखाद्या क्रांतिकारकावरील लेख त्याच्या जयंती वा पुण्यतिथीचे औचित्य साधून टाकल्यावर त्वरित प्रसिद्ध करावा अशी विनंती केली होती आणि प्रशासकांनी तिला मान दिला होता. ). प्रशासकांनी त्यांना केलेल्या विचारणेला उत्तर दिले नाही यास्तव अनेकांची रास्त नाराजीही आहे पण त्यामागे प्रशासकांचीही काही भूमिका असावी आणि काही कारणास्तव त्यांना त्यावर चर्चा करायची नसावी.
या प्रतिसादाच्या अखेरीस मी इतकेच म्हणेन की हा सहभाग हा मला आशेचा किरण वाटतो.