सर्वप्रथम सर्वसाक्षी यांचे आभार मानतो कारण, माझ्यासारख्या अनेकांच्या मनातील प्रश्नांना त्यांनी या चर्चेद्वारे वाचा फोडली. अन सर्व प्रतिसादांतून अनेक सदस्यांची मनोगताविषयीची तळमळ दिसून आली.
माझ्या मते मनोगत तारखेनुसार आद्य मराठी संस्थळ नसले तरी, मराठी आंतरजालावरील अनेक नव्या संकल्पनांची मुहूर्तमेढ यावर रोवली गेली व त्यांना चांगलीच लोकप्रियताही मिळाली. आजही अनेक तांत्रिक सुविधांमध्ये मनोगत आघाडीवरच आहे. शुद्धिचिकित्सकामुळे तर मराठीतून लिहिणाऱ्यांची फारच सोय झालेली आहे.
मला स्वतःला वाचनाची आवड असली तरी पुस्तकं, कादंबऱ्या वगैरेंचे नियमित वाचन करणे मला आजवर जमले नाही. पण मनोगतावर गेल्या ६ वर्षांत मी नियमितपणे विविध विषयांवरील लेखन वाचले. अन मला अनेक गोष्टींबद्दल बहुमूल्य ज्ञान मिळाले. त्याबद्दल मी मनोगताचा आजन्म ऋणी राहीन. इतर सदस्यांप्रमाणेच मनोगतावर आलेले शौथिल्य पाहून मलाही मनापासून वाईट वाटते. पण काहीही असले तरी केवळ संस्थळाची लोकप्रियता वाढवत राहण्यासाठी प्रशासकांनी कुठल्याही असंस्कृत प्रवृतींना वाव दिला नाही याचा एक मनोगती म्हणून अभिमान वाटतो.
यावर उपाय म्हणून या चर्चेत वर सुचवल्याप्रमाणे प्रशासकांनी धोरणात थोडी लवचीकता आणली तर नक्कीच आनंद होईल. याखेरीज मनोगताविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्व सदस्यांना आग्रहाने सांगावेसे वाटते की कृपया नव्या लेखनावर नियमितपणे प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करा. कारण वाचकसंख्या आजही बरीच असणार पण कुणीच प्रतिक्रिया देत नाही मग मी तरी कशाला देऊ असा विचार प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण जर सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर प्रत्येकाने योगदान द्यायलाच हवे.
विशेषकरून गेल्या काही महिन्यांत मनोगतावर बरेच नव-लेखक लिहिताहेत. अनुभवी सदस्यांकडून त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा हुरूप वाढेल व लेखनाचा दर्जाही उंचावेल. अन एकदा संवाद वाढला की मनोगत आपल्याला पूर्वीसारखे वाटू लागेल याची खात्री वाटते.