अजूनही नेमके लक्षात आले नाही संजयराव.
विलंबाने प्रसिद्ध होत असल्याने प्रतिसाद देण्यातले स्वारस्य नष्ट होते हे खरे पण इथे आता जे प्रतिसाद येत आहेत ते बहुधा विनाविलंब प्रसिद्ध होत असावेत. मनोगतावर वाचनसंख्या सुविधा नसल्याने एखादे लेखन इथे आलेल्यांपैकी साधारण किती जण वाचतात हे समजायला काही मार्ग नाही.
शिस्तीचे म्हणाल तर इथे वेडेवाकडे वा अप्रसिद्ध करावे लागेल असे लेखन अत्यल्पच होते. मग जर बहुसंख्य लेखन हे 'स्वीकारार्ह' असते आणि खोडसाळपणा करायचा उद्देश नसेल तर कुणाला लेखनासाठी प्रत्यवाय असेल असे नाही. अन्य संस्थळांवर चक्कर मारली असताही 'तिथे आहेत पण इथे दिसले नसते' अशा सदरात मला तरी काही दिसत नाही. काही संस्थळांवर वातावरण मोकळे असते, काही ठिकाणी केवळ गाढ्या चर्चा होतात वा गंभीर व सखोल लेखन होते. प्रत्येक संस्थळाची प्रकृती वेगळी आहे. इथले वातावरण जे आहे ते पाहिल्यापासूनच असे आहे, ते बदलाने असे झालेले नाही. माझ्या मते वातावरण औपचारिक आहे पण जाचक निश्चित नाही. बंधने असणे चुकीचे नाही, अन्य संस्थळांवरही अनिष्ट लेखन वा प्रतिसाद उडविले जातात, प्रमाण व परिमाण वेगळे असते इतकेच.
जिथे 'मौजमजा' अशी ओळख आहे, जिथे कशावरही लिहिलेले चालते, जिथे एकमेकांना वैयक्तिक स्वरूपाचे प्रतिसाद जाहीर देता येतात तिथे अधिक सदस्य वळणे स्वाभाविक आहे पण म्हणून इथले सदस्य लिहीत नाहीत वा नव्याने कोणी येतच नाही वा प्रतिसाद देण्याची इच्छाच नाही असे का? अधिक सदस्य वा अधिक लेखन/ प्रतिसाद म्हणजे अधिक चांगले असे नाही पण तसे असणेही वाईट नाही!
मला या चर्चेतून असे जाणवते की या चर्चेत बहुतेक मतप्रदर्शन हे जुन्या सदस्यांकडूनच झालेले आहे, नवे यात सहभागी का झाले नसावेत? इथे नवे -जुने असे स्वरूप नव्हते तर घटणारे लेखन व प्रतिसाद हे निमित्त होते. या चर्चेनिमित्ताने नव्या सदस्यांचेही मत समजले तर आनंद होईल.