मराठी जालवावर हा केवळ पंधरा वर्षे वयाचा आहे. पन्नाशी साठीचे लोक जालावर तुरळक असतात. नेट-सावी,कंप्यूटर-सावी जनरेशन ही मुख्यत्वाने तरूण आहे. ह्या तरुणाईला वावरावेसे वाटेल असे वातावरण असले तर त्यांचे पाय इकडे वळतील. नर्म किंवा सख्त विनोद, तिरकस शेरे-ताशेरे हे हवेतच.(हे वाक्य अर्थात प्रतिसादकांना उद्देशून.) इतर भाषांतले शब्द आता महानगरातील लोकांना तरी परके वाटत नाहीत. मराठी शुद्धलेखनही बदलते आहे. आपोआप आणि हट्टाने. कसेही असले तरी मराठी शुद्धलेखनाचे नियम दहा-पंधरा किंवा वीस-पंचवीस वर्षांनी बदलतीलच. इंग्रजी माध्यमातून शिक्षण, विशेषतः संगणकीय शिक्षण आणि सार्वत्रिक शिक्षण ही मोठी कारणे आहेत. ज्या योगे मराठी जालवावर सर्वांच्या आवाक्यात येऊ लागला, तेच संगणकीय शिक्षण आणि सार्वत्रिक शिक्षण मराठी भाषेच्या गोत्रास काळ झाल्यासारखे वाटते. तेव्हा गोतास वाचवायचे तर शुद्धतेचा फारसा आग्रह धरू नये असे वाटते. अर्थात मराठी भाषेची शुद्धता हेच मनोगताचे व्यवच्छेदक लक्षण आणि ब्रीद असल्यामुळे ते नसेल तर मनोगताची वेगळी ओळखच उरणार नाही हेही खरेच.