>>शुद्धलेखनाचा आग्रह धरणारे एकमेव संकेतस्थळ ही मनोगताची ओळख झाली आहे.
इथले वातावरण सभ्य आहे आणि ते तसे असावे यासाठी प्रशासक दक्ष आहेत ही भूषणस्पद बाब आहे. पण नेमकी हीच बाब काही घटकांना खटकत असावी. << हे सत्य आहे. इतर अनेक संकेतस्थळांवरचे लिखाण शुद्धलेखनाच्या चुकांनी बुजबुजलेले असते, ते वाचवत नाही.
लेखनामध्ये संवाद दर्शवणारे शब्द किंवा वाक्ये नसतील तर बोलीभाषा वापरू नये, हा शुद्धलेखनाचा एक साधा नियम आहे. केलं, गेलं, मेलं असले अंकारान्त शब्द गंभीर लिखाणात असता कामा नयेत. असे असून हे शब्द रोज पहायला मिळतात. त्यांतूनही अनेकदा अनुस्वार देण्याचा कंटाळा केल्यामुळे केल, गेल, मेल हे शब्द उमटतात. केलं असे लिहिण्यापेक्षा केले असे लिहिणे अतिशय सोपे आहे. लेखक तसे का करीत नाहीत?
बोलीभाषेनुसार केलेले लिखाण निषेधार्ह असून प्रमाण लेखी मजकुरावरून योग्य वाटतील तसे उच्चार करणे हेच तर्कसंगत आहे. इंग्रजीचे उच्चार देशागणिक आणि प्रांतागणिक बदलतात, तरी लिखाणातले स्पेलिंग आणि व्याकरण मात्र बदलत नाही. इंग्रजीने लिखाण बोलीभाषेत लिहायचे ठरवले असते तर तिचा प्रचार जगभर झाला नसता. आपले लिखाण किमान महाराष्ट्रातील सर्वांना कळावे असे वाटत असेल तर ते शुद्ध प्रमाण भाषेत असावे. तसे असेल तरच ते जगभरातील सर्व मराठी जाणणाऱ्यांना समजेल.
>> मराठीचे शुद्धलेखनाचे नियम बदलत आहेत<< जर दुर्दैवाने बदललेच तर गुजराथी आणि मल्याळमचे झाले तसे होईल. जुनेही समजणार नाही आणि नवेही नाही!
>>सभासद नसलेल्या वाचकांना पण प्रतिसाद देता यावे <<हरकत नाही, अट एवढीच(बशर्ते) की लिखाण मनोगताला शोभावे.
>>लेखनाचे अनुक्रमणिकांतील उल्लेख मराठीत असावेत हे धोरण आहे. <<असे असले तरी खाली दिलेले अपवाद असायला हरकत नाही.
"आप कतारमें है", "ग्रेसफुल ग्रेस", "हॅपीली एव्हर आफ्टर वगैरे. जसे 'वंदे मातरम्' चालते तसे हेही शब्द गरजेनुसार चालावेत.
अनेक हिंदी शब्दांना मराठीत चपखल पर्याय नाहीत. उदा० लाजवाब, बशर्ते, बहोत खूब, अच्छा वगैरे. असल्या शब्दांना केवळ ते हिंदी आहेत म्हणून लिखाणात आणि मथळ्यांतही मज्जाव असू नये. जो नियम हिंदीला तोच इंग्रजीसकट अन्य भाषांना.
>>मनोगतावर लेखन सुपूर्त करण्याअगोदर शुद्धिचिकित्सकाचा वापर करून व/वा इतर प्रकारे शक्य तितक्या चुका सुधाराव्या.<< मनोगताचा स्वयंसुधारक हल्ली चालत नाही असे दिसते आहे. शब्दांखाली र्तांबड्या रेघा उमटतात. पूर्वी शब्द आपोआप दुरुस्त होत असत.
>>परभाषेतील कवितेचा अनुवाद मनोगतावर प्रकाशित करायचा असेल तर तो छंदबद्ध असावा लागतो. अगदी मूळ कविता मुक्तछंदात वा छंदमुक्त असली तरी.<< हा आग्रह सोडून द्यावा. कविता मुक्तछंदात असणे हेच तिचे सौंदर्य असेल तर ती तशीच असावी.
>>प्रत्येक प्रतिसादाला वर जाऊन रोमन निवडणे फार गैरसोयीचे आहे. ही कळ प्रतिसादाच्या खिडकीतच देता येईल का? << हे समजले नाही. कंट्रोल+टीने केव्हाही लिपीबदल करता येतो, हे सभासदांना माहीत नाही का?