प्रथम मूळ लेखातील चुकीची दुरुस्ती करतो. फेलिक्सच्या नावाचा उच्चार फिलिक्स असा केला जातो. मूळ लेख लिहिला तेव्हा हे नाव इतके काळजीपूर्वक ऐकले नव्हते त्यामुळे स्पेलिंगनुसार उच्चार लिहायच्या सवयीने घात केला.
१. आजवरच्या कुठल्याही मोहिमेत वापरल्या गेलेल्या हिलियम बलूनपेक्षा बऱ्याच अधिक क्षमतेचा बलून वापरण्यात आला.
२. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ः३० ला बलूनने उड्डाण केल्यावर अडीच तासांनी १ लक्ष २८ हजार ९७ फूट (३९ किमी) एवढी उंची गाठण्यात आली. अगोदर ठरविलेली उंची १ लक्ष २० हजार फूट इतकीच होती.
३. या सर्व काळात नियंत्रण कक्षाच्या साहाय्याने फिलिक्सने दोनदा विविध घटकांची खातरजमा करून घेतली. यामध्ये विविध उपकरणांची स्थिती, विविध इंडिकेटर्सवर दिसत असलेले आकडे किंवा दिव्यांचा रंग वगैरे. या सर्व काळात फिलिक्सला व्यस्त ठेवणे फार महत्त्वाचे होते. प्रेशर सूटवरील इंडिकेटर्सची स्थिती बघण्यासाठी फिलिक्स एका छोट्या आरशाचा वापर करत होता.
४. सर्व उपकरणे व्यवस्थित चालत असली तरी फिलिक्सच्या शिरस्त्राणाच्या काचेवरील आर्द्रता नियंत्रित करणारे उपकरण व्यवस्थित काम करत नव्हते. अर्थात मोहीम थांबवण्याइतका हा घटक उपद्रवी नव्हता.
५. बलूनची गती वाढविण्यासाठी अधून मधून हिलियम वायूचे आकारमान कमी करण्यात येत होते.
६. या सर्व काळात कुपीमध्ये भूपृष्ठावर असलेल्या हवेचा दाबाएवढा दाब कृत्रिमपणे राखण्यात आला. पण उडी मारताना कुपीचे दार उघडण्यासाठी हा दाब नियंत्रित करणे थांबवण्यात आले. फिलिक्सने परिधान केलेला प्रेशर सूट यावेळी (अपेक्षेप्रमाणे) फुगू लागला.(अवकाशातील निर्वात पोकळीत मानवी शरीराला भूपृष्ठावर असलेल्या दाबासारखी परिस्थिती कृत्रिम पद्धतीने मिळवून देणारा विशेष सूट. या प्रकारचा सूट अंतराळवीर वापरतात)
७. प्रेशर सूटमधील दाबाचे प्रमाण आवश्यकतीवढे बनल्यावर आसना समोरील उपकरणे बाजूला सारून फिलिक्सने कुपीचे दार उघडले. समोर दिसणारे अवकाशाचे मनोहर रूप अत्यंत विलोभनीय वाटत होते.
८. सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत व सर्व परिस्थिती उडी मारण्यास अनुकूल आहे याची खातरजमा केल्यावर नियंत्रण कक्षाद्वारे फिलिक्सला उडी मारण्याची सूचना करण्यात आली.
९. यावेळी फिलिक्सने उडी मारण्यापूर्वीचा शेवटचा संदेश नियंत्रण कक्षाला दिला व सलाम करून एकदम सहजपणे कुपीबाहेरील पायरीवरून स्वतःला बाहेर ढकलून दिले. नेहमी उडी मारताना पायांतून जसा जोर लावला जातो तसे अजिबात न करता.
१०. कुपीवरील कॅमेऱ्यातून हे दृश्य अत्यंत थरारक दिसले. फिलिक्सची क्षणाक्षणाला लहान होत जाणारी आकृती काही क्षणांतच दिसेनाशी झाली.
११. यापुढचे दृश्य जमिनीवरील शक्तिशाली इन्फ्रारेड कॅमेऱ्यांद्वारे दाखवले जात होते. थेट प्रक्षेपणात फिलिक्सचा वेग व उडी मारल्यापासूनचा अवधी दाखविण्यात येत होते.
१२. सर्व काही सुरळित पार पडत आहे असे दिसत असतानाच, फिलिक्सचे शरीर अनियंत्रितरीत्या स्पिन होऊ लागले. हे पाहून नियंत्रण कक्षातील वातावरण एकदम तणावग्रस्त झाले. कारण स्पिन होण्याचा वेग फार वाढल्यास शरीरातील रक्त मेंदूकडे सरकून प्रथम बेशुद्धावस्था व नंतर मृत्यूदेखील ओढवू शकतो.
१३. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक वेगळे पॅराशूट फिनिक्सजवळ होते पण त्याचा उपयोग केल्यास वेग कमी होऊन सूपरसॉनिक वेग गाठण्याच्या उद्दिष्टावरच पाणी फेरल्या गेले असते. जो काही निर्णय घ्यायचा होता तो केवळ काही सेकंदातच घेणे आवश्यक होते. जिगरबाज फिलिक्सने या मार्गाचा अवलंब न करता प्रथम एक हाताला शरीराच्या काटकोनात स्थिर करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने शरीराची ती स्थिती स्पिन होण्याच्या दिशेला अधिक अनुरूप असल्याने उलट परिणाम झाला.
१४. क्षणार्धात फिलिक्सने तो हात शरीराजवळ ओढून दुसरा हात काटकोनात स्थिर केला. यावेळी स्पिन होण्याची तीव्रता कमी होऊ लागली व भूपृष्ठापासून जवळ येऊ लागल्याने वातावरणाची घनता वाढू लागली व फिलिक्सचा वेग कमी होऊ लागला. त्याअगोदर त्याने गाठलेला सर्वाधिक वेग होता (१३४२ किमी/तास - नवा विक्रम). ३५ हजार फूट उंचीवर असल्यापासून त्याच्या प्रेशर सूट मधील दाबाची तीव्रता कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जेणेकरून त्याला हालचाल करणे सोपे जाईल.
१५. उडी मारल्यापासून चार मिनिट वीस सेकंदांनी फिलिक्सने पॅराशूट ओपन केले व फ्रिफॉल संपून तो पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीकडे कमी वेगाने येऊ लागला. फ्रिफॉलद्वारा त्याने १ लक्ष १९ हजार ८४६ फुटांचे अंतर पार केले. उरलेले ४ हजार ९०० फुटाचे अंतर त्याने अंदाजे पाच मिनिटात पार पाडले व मोहीम पूर्णत्वाला पोचली. उड्डाणाच्या काही मैल अंतरावर फिलिक्स उतरला.
१६. हेलिकॉप्टर्सद्वारे फिलिक्सचे डॉक्टर व इतर काही सहकारी काही क्षणातच त्याजागी पोचले व फिलिक्सच्या सुखरूप असल्याची खातरजमा झाली. नियंत्रण कक्षात जल्लोश झाला. फिलिक्सचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
१७. काही तासांनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व आकडेवारी देण्यात आली. हि आकडेवारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांकडून प्रमाणित केले जाणे बाकी आहे.
१८. पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत विनम्रपणे फिलिक्सने सांगितले की अश्या आत्यंतिक उंचीवर पोचल्यावर सर्वप्रथम होणारी जाणीव म्हणजे विश्वाच्या अनंततेपुढे आपले अस्तित्व किती क्षुल्लक आहे. सूपरसॉनिक वेगात असताना कसे वाटत होते या प्रश्नावर त्याने उत्तर दिले की, प्रेशर सूटमुळे व अवकाशातील जवळ जवळ निर्वात पोकळीमुळे व तुलना करण्यासाठी कुठलेच दुवे नसल्याने शरीराला वेगाच्या तीव्रतेची अनुभूती होत नव्हती परंतु डोक्यात चालणाऱ्या विचारांद्वारे मात्र विचित्र अवस्था होत होती जी शब्दांत मांडणे अवघड आहे.
चित्रफिती - फिलिक्सची उडी, पत्रकार परिषद
टीप - वरील माहितीचे विश्लेषण मी माझ्या कुवतीनुसार केले आहे. त्यामध्ये त्रुटी असण्याची शक्यता आहे.