हा बहुचर्चित चित्रपट पाहिला एकदाचा. पाहण्यापूर्वी अपेक्षा खूपच वाढलेल्या असल्यामुळे असेल कदाचित, पण फार काही आवडला नाही. ठीक वाटला. दिग्दर्शन आवडले. इंग्लिश शिकवणी वर्ग मात्र भन्नाट आहे. पण त्यातही 'जबान संभालके' आणि 'माइंड युअर लँग्वेज (किंवा तत्सम शीर्षक) या मालिकांची आठवण झालीच. नायिकेच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीने येऊन तिचे आत्मभान आणि आत्मविश्वास जागृत करणे या मध्यवर्ती संकल्पनेवर 'रेन मॅन', सुंदर मी होणार, 'अशी पाखरे येती' असे अनेक इंग्लिश, मराठी चित्रपट , नाटके येऊन गेलेली आहेत. प्रत्येक दिग्दर्शकाने आपापल्या कुवतीनुसार ती फुलवली आहे. काही संकल्पनांना मरण नसते. त्यांतली ही एक. पण अशा थीम्ज हाताळणे हे दिग्दर्शकासाठी आव्हान ठरते कारण जुन्या घिशापिट्या कल्पनेला नवीन रूप देताना पूर्वसूरींशी तुलना होणारच असते. गौरी शिंदेने ते ठीक पेलले आहे. संवादही चांगले आहेत. 'मुझे प्यार नहीं, थोडीसी इज्जत चाहिये' सारखी वाक्ये टाळ्या घेतात.
श्रीदेवीने मात्र (माझी तरी) निराशा केली. तिला भूमिकेचे बेअरिंग पकडता आलेले नाही.न्यूनगंडातून निर्माण झालेला धांदरटपणा दाखवताना ती चक्क कॉमेडीचा आधार घेते. त्यामुळे तिथे व्यक्त व्हायला हवे असणारे कारुण्य मनावर ठसतच नाही. संवादफेक भयंकर आहे. अर्थात डबिंग असणार. असो. ज्याची त्याची आवड. 'अनुभव' मधली तनुजा अजूनही आठवते आणि त्यातले 'दरवाजा किसने बंद किया' हे तिच्या किंचित खरबरीत आवाजातले वाक्यही...
पण तेही असोच.