बहुविध विकलांगतेसह आयुष्य जगू पाहणारी, धडपडणारी मुले, त्यांचे पालक आणि त्यांच्या काही संस्था यांच्याशी थोडाफार परिचय आहे. ऑटिज़म आणि मनोरुग्णता यांच्याशी सामना करणारी मुले आणि त्यांचे पालक अगदी निकटचे नातेवाईक आहेत. त्यांचा तो 'रात्रंदिन युद्धाचा प्रसंग' नित्याच्या पाहण्यातला असल्याने लेख मनाला अधिक भिडला. त्यातही मनोरुग्ण मुलांचे दुर्भाग्य असे की त्यांची दुर्बलता जगाला दिसून येत नाही त्यामुळे त्यांची हेटाळणी आणि कुचेष्टा होते. आपला समाज याबाबतीत इतका संवेदनाशून्य आहे की अशा मुलांवर एखाद्या कुत्र्याला मारावे तसे दगड भिरकावले जातात.

पालकांकडे थोडीफार आर्थिक सुरक्षितता असेल तर या मुलांवर काही उपचार होऊ शकतात. पण पालकही कुठवर पुरे पडणार?मुलांच्या भविष्यकालीन तरतुदीच्या ओझ्याने आणि काळजीने ते आधीच दबलेले असतात. मनोरुग्णतेच्या संबंधात  एक निरीक्षण आहे की पालकांपैकी कोणीतरी एक, बहुधा वडीलच, मनोरुग्ण असतात. (मुलगा मनोरुग्ण असला तरी ही गोष्ट दडपून ठेवून एखाद्या गरीब मुलीशी लग्न लावून दिले जाते.) त्यामुळे जोडीदारावर प्रचंड दुहेरी ताण असतो. नवऱ्याच्या विचित्र वागण्याशी सामना करीत अपत्याचीही काळजी आईलाच वाहावी लागते. पराकोटीची गरीबी, घरातला छळ (असे मूल जन्माला घातले म्हणून) आणि अडाणीपणा/अंधश्रद्धा यामुळे कित्येकदा अशी मुले गोणत्यात बांधून रस्त्यावर, रेल्वे रुळांवर सोडून दिली जातात.

ज्योतीताईंनी अत्यंत कठिण असे काम हाती घेतले आहे. त्यांना शुभेच्छा.  लेखिकेने ज्योतीताईं  आणि त्यांचे स्फूर्तिदायक कार्य या लेखाद्वारे वाचकांपर्यंत उत्तमरीत्या पोचवले आहे. मंजुशाताईंचे अभिनंदन.