प्रोफेसरसाहेब / अज्ञातपंत,
आपल्या प्रतिसादांबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल पुनः धन्यवाद.
मी गझलेचा एक विद्यार्थी म्हणून जाणून घेऊ इच्छितो की हा अलामतीमधला अपवाद फक्त ऱ्हस्व स्वरचिन्हातच का?
भटांच्या इतरही गझला (उदा. हा असा चंद्र.... फिरायासाठी/धरायासाठी/झुरायासाठी) तसंच इतर अनेक उर्दू गझला आठवून बघितल्या (उदा. दिल-ए-नादां : गालिब). यांत ऱ्हस्व स्वरचिन्हे मतल्यात बदलली आहेत आणि त्यामुळे पुढील शेरांत त्यांतून मुक्तता झाली आहे.
काही इतर उर्दू गझलाही आठवल्या.
उदा. दागचीः
खातिर से या लिहाज से मै मान तो गया
झूठी कसम से आपका मान तो गया

.. पुढे 'एहसान तो गया' आणि 'सामान तो गया' असंही आहे.
किंवा
मजरुह सुलतानपुरींचीः
मुझे दर्दे दिल का पता न था मुझे आप किस लिए मिल गए
मै अकेले यूंही मजे में था मुझे आप किस लिए मिल गए
आता उर्दूतल्या मात्रांच्या नियमांप्रमाणे (मला असं वाटतं) या दोन्ही शेरांमध्ये मैं आणि में हे 'पडतात', म्हणजे गुरू न राहता मात्रांमध्ये लघू म्हणून उच्चारले आणि गणले जातात.
मराठीत अशी गुरू अक्षरं (उदा. ओ, ए, ऐ स्वरचिन्हं असलेली) लघू होत नाहीत. नग नात्रांच्या बेरजेच्या दृष्टीनं ती गुरूच ठेवून अलामतीचा नियम उर्दूप्रमाणेच वापरता का येऊ नये?
-कुमार
ता. क. २ लघूंचा १ गुरू करणं हा नियम (मराठी अक्षरगणवृत्तात नसला तरी) आपण आणलाच आहे की गझलेत! (भटांनीही म्हटलंय की गझल शक्यतो अक्षरगणवृत्तातच असावी. )