हेशजी, आजानुकर्णजी!
आमचा शेर असा आहे.......
विचार आता मला, तुझ्या जे मनात आहे....
निवांत आहेस तू, मलाही उसंत आहे!<<<<<<<
शेरातील गद्य अर्थ व त्यातील पद्य/काव्य/कविता.......खालीलप्रमाणे.......
हा शेर म्हणजे दोघांमधला संवाद आहे.
कोण हे दोघे बोलत आहेत, एकमेकांशी?......
तो शायराने स्वत:शीच केलेला संवाद असू शकतो.
किंवा एका मनाने दुसऱ्या मनाशी(स्वत:च्याच) केलेला संवाद असू शकतो.
किंवा शायर व त्याचा परमेश्वर, जो त्याच्या अंतरातच वसलेला आहे, यांचा तो संवाद असू शकतो.
किंवा आत्मा व परमात्मा यांचे ते संभाषण असू शकते.

आम्ही असे मानतो की, आमच्या हृदयातच परमेश्वर वसला आहे, त्याचा एक आवाज असतो, ज्याला आम्ही अंतर्नाद असे संबोधतो! आमच्यात एक चांगले मन आहे, ज्याचा आवाज(अंतर्नाद) हा खूप सूक्ष्म असतो. दैनंदीन रहाटगाडग्यात, धांदलीत, तो आवाज दबला जावू शकतो. माणूस आपल्या बुद्धीने निर्णय घेतो व त्याची बरीवाईट फळे त्याच्या वाट्याला येतात. जेव्हा माणूस एकटाच असतो, तेव्हा त्याचा या अंतर्नादाशी संवाद  साधू शकतो. जणू काही शायर व त्याचा अंतस्थ परमेश्वर/ अंतर्नाद दोघांनाही सवड असते एकमेकांशी आपले गूज बोलायची! यालाच आम्ही meditation/ध्यानधारणा म्हणतो.
जेवढी शायराची तंद्री प्रामाणिक, तेवढी संवादाची पातळी उच्च! याच क्षणांमधे शायराचा परमेश्वर त्यास मार्गदर्शन करतो, कौल देतो व पुढील जगण्याचे बळ देतो.
यासाठी हवा निवांत, हवी उसंत, हवा प्रामाणिकपणा, हवी परमेश्वराशी जवळीक, हवी श्रद्धा, हवा विश्वास, हवी तयारी आपले मन व इच्छाशक्ती सुद्धा परमेश्वरावर सोपवायची, हवी इच्छा परमेश्वराची मर्जी जाणून घेण्याची, हवी तयारी आपले आयुष्य परमेश्वरावर सोडायची व हवे बिनशर्त समर्पण(unconditional surrender)!

टीप: आमच्या मनातील अर्थ सांगितला. हे सर्व आम्ही दोन ओळीत आणण्याचा प्रयत्न केला. इथे दोघे कोण, हे आम्ही मुद्दामच अव्यक्त ठेवले आहे. आपापल्या पिंडानुसार/प्रवृत्तीनुसार/प्रगल्भतेनुसार/
सौंदर्यबोधानुसार रसिक अर्थ काढू शकतात!
......................प्रा.सतीश देवपूरकर