अहाहा! तुमच्या रूपाने मराठीत ग़ालिबाने जन्म घेतला आहे.
चंद्र शोधती नितांत लाटा
नितांत म्हणजे एक्स्ट्रॉऑर्डिनरी. विशेष.
१. समुद्राचे पाणी चंद्राने आकर्षित केल्यामुळे लाटा येतात. पण आज दुनियेतले सगळेच चंद्र एकाच समस्येवर येऊन ठेपले आहेत. रोजच्या त्याच त्याच लाटांना ते कंटाळले आहेत. त्यांना आता त्या विशेष लाटांची आस लागली आहे.
२. लाटा आपल्या लाडक्या चंद्राला शोधत आहेत. लाटा विशेष आहेत. चंद्र विशेष आहे. शोधही विशेष आहे.
वा! श्लेषात श्लेष गुंफले आहेत!! कमाल आहे...
अमेस विरही अशांत लाटा
अमा म्हणजे अमावास्या. आज चंद्र भेटणार नाहीत. म्हणजे आज विरहाचा दिवस. त्यामुळे लाटा अशांत झाल्या आहेत.
चंद्र शोधती नितांत लाटा
अमेस विरही अशांत लाटा
आता मतला एकत्र वाचू. काय सुंदर अर्थ लागत आहे नाही मतल्याचा! वा महाराजा.
गलबत नवखे, नवखे वादळ
शहारल्या नखशिखान्त लाटा
जीवनात नेहमी येणाऱ्या वादळांची लाटांना सवय आहे. अश्या वेळी त्या ज्यांच्यावर जाऊन आदळतात ती जहाजेही त्यांच्या ओळखीची आहेत. पण आज काहीतरी विशेष घडले आहे. हे वादळ वेगळेच आहे. आज भेटणारी गलबतेही वेगळी आहेत. त्यामुळे लाटांवर रोमांच उभे राहिले आहेत. त्यांचा कण अन् कण ह्या रोमांचांनी भरून आला आहे.
अल्लड सरितेच्या वेगाशी
संगम करती निवांत लाटा
अल्लड सरिता म्हणजे नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेली युवती. तिचा वेग म्हणजे नुसता वेग नाही तर आवेगही आहे. अश्याच एखाद्या निवांत क्षणी त्याच्या उत्साहलहरी तिच्याशी समरस होतात. तो संगम मोठा विलोभनीय आहे.
प्राचीचा शृंगार कराया
सप्ताश्वाच्या निशांत लाटा
निशांत म्हणजे तणावमुक्त. शांत. प्राची म्हणजे पूर्वदिशा. सूर्याच्या रथाला सात घोडे असतात. ह्या घोड्यांची दौड जेंव्हा सुरू होते तेंव्हा प्रकाशाच्या आणि उत्साहाच्या लाटा वाहू लागतात. ह्या जणु प्राची नामक युवतीचा शृंगार (मेक अप) करायला निघाल्या आहेत. वा!
पतितपावना गंगा थकली
पृथ्वी मागे युगांत लाटा
पतित म्हणजे आपल्या कृत्याने अधोनतीस गेलेला माणूस. अशा माणसांच्या पापांचे परिमार्जन करायचे काम गंगानदी कित्येक वर्षे करत आली आहे. पापाचे ओझे इतके झाले की आता हे सगळे संपावे असे वाटत आहे. म्हणून पृथ्वी देवाची आराधना करत आहे. युगान्त करणाऱ्या प्रलयलाटा पाठव रे बाबा आणि सोडव ह्या ओझ्यातून.
उरात सिंधूच्या वडवानल
धुमसे सागर, कृतान्त लाटा
सागराच्या हृदयात वेदनेच अग्नी धगधगतो आहे. त्यामुळे सागर धुमसत आहे. ह्याचा शेवट एकच. तो म्हणजे ह्या सर्व कृत्यांचा अंत करणाऱ्या शेवटच्या लाटा.
अहाहा! लाटांचे प्रतीक घेऊन अंतरीची वेदना किती प्रभावीपणे मांडली आहे तुम्ही. केवढे हे कसब!