'आत्मविचार' ही साधना रमण महर्षीं यांनी शोधून काढलेली नाही. महर्षी तसा दावा करत नाहीत. महर्षींनी या साधनापद्धतीला पुन:प्रस्थापित केले इतकेच. आत्मविचार ('मी आहे' असे जे अव्याहतपणे स्फुरण होत असते त्याच्या उगमाचा शोध घेत त्यात मनबुद्धीचा विलय करणे) या एकमेव साधनापद्धतीचा महर्षी सरसकट पुरस्कार करत असत असेही नाही. तिचा अवलंब करायला एक प्रकारची 'पक्वता' लागते असे ते सांगत असत. सगळे मार्ग शेवटी आत्मविचारात परिणत होतात असे ते म्हणत. ( माझ्या मते तशी बसल्याजागी तर्कनिष्पत्ती काढून इतरांना तिच्या जोरावर निरूत्तर करावे असा याचा अर्थ होत नाही! कुणी तसे करत असेल तर तो एक दुर्दैवी अपप्रकारच ठरेल असे माझे ठाम मत आहे). भक्ती ही ज्ञानमाता आहे असे ते म्हणत असत. साधक/ उपासकांच्या जीवनातले गुरूंचे अतुलनिय स्थानही त्यांना पूर्णपणे मान्य होते. नानाविध प्रकारे गुरुपदिष्ट मार्गाने साधना/ उपासना करणार्या साधक/ उपासकांना भगवानांचे आशीर्वाद आणि मोलाचे मार्गदर्शन मिळत असे. त्यांना चूक ठरवणे, खजिल करणे, पथभ्रष्ट करणे असे प्रकार भगवानांनी उभ्या आयुष्यात कधीच केले नाहीत.
डेव्हिड गॉडमन यांनी संकलित केलेल्या 'बी ऍज यू आर - द टीचिंग्स ऑफ भगवान श्री. रमण महर्षी' या पुस्तकाला भगवानांच्या शिकवणीबद्दल सर्वसाधारणपणे 'प्रमाण' मानले जाते. ज्यांना रमण महर्षी आणि आत्मविचार या विषयात स्वारस्य असेल आणि इंग्रजी वाचनाची गोडी असेल त्यांनी हे पुस्तक अवश्य अभ्यासावे, संग्रही ठेवावे असे सुचवतो. मराठी वाचकांनी 'श्री. रमण महर्षी - चरित्र आणि तत्त्वज्ञान' या यशवंत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कै. डॉ. हरिहर गंगाधर मोघे यांनी अनुवादित केलेल्या (मूळ लेखक - आर्थर ऑसबोर्न) संदर्भ अवश्य घ्यावा.