कोट्यावधी लोकांप्रमाणेच मीदेखील बाळासाहेबांच्या विचारांपासून प्रेरित होतो, आहे व नेहमीच राहीन. त्यांच्या विचारातील स्पष्टपणा, एकदा घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहण्याची वृत्ती व जीवाला जीव देणारी माणसे घडवण्याची त्यांची हातोटी या गोष्टी आजच्या काळात विरळाच.

त्यांच्याबद्दलची भावलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची ठरणारी माणसाची जात त्यांच्या पक्षात नगण्य होती; माणसाच्या जातीपेक्षा त्याची योग्यता, कार्यावरील निष्ठा व परिश्रम हेच त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावू शकत.

रालोआच्या सत्ताकाळात इतर प्रादेशिक पक्ष स्वतःच्या राज्याच्या हितसंबंधांसाठी केंद्रसरकारला वेठीस धरत असताना महाराष्ट्राने नेहमीच त्यागाची भूमिका घेत मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले शेवटी कुणीतरी देशहिताचा विचार केल्याशिवाय राष्ट्राचे गाडे पुढे कसे सरकेल? बाळासाहेबांच्या खंबीर नेतृत्वामुळेच हे शक्य होऊ शकले.

बाळासाहेबांना त्यांच्या सभेत प्रत्यक्ष ऐकण्याच्या अनेक संधी गमावल्याबद्दल मला आजही वैषम्य वाटते. पण १२ वर्षांपूर्वी सेनेचे अधिवेशन आमच्या शहरात झाले होते त्यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा विश्रामगृहाकडे निघालेला असताना रस्त्याच्या कडेने त्यांना बघू शकलो. सकाळची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती पण तरीही त्यांचे हात लोकांसाठी जोडलेलेच होते. त्यांच्या प्रसिद्ध काँन्टेन्सा गाडीमध्ये शेजारी उद्धव बसले होते. त्या क्षणाकरिता मी स्वतःला भाग्यवान समजतो.

समाजासाठी व देशासाठी असलेले त्यांचे बहुमोल योगदान न बघता त्यांच्या कारकीर्दीतील केवळ काही घटनांचा एकांगी विचार मांडत काही तथाकथित विचारवंत (दुर्दैवाने त्यात बरेच मराठीही आहेत) त्यांच्या मृत्यूदिवशीही त्यांच्याबद्दल वाईट बोलतात हे पाहून मनापासून वाईट वाटते. मराठी माणसाचा आवाज ताकदीने मांडणारा आज कुणीही नाही हे गोष्ट मनाला चटका लावून जाते.

झाले बहु, होतीलही बहु, परंतु यासम हाच.