आजकाल मराठी साहित्याशी संबंधित कोणतेही चर्चासत्र, बैठक, परिसंवाद या ठिकाणी मराठीच्या प्राध्यापकांचा सुळसुळाट (खरे तर मला बुजबुजाट म्हणायचे आहे) असतो. ह्याचे एक कारण बहुधा असे असावे की प्राध्यापकांना विद्यार्थ्यांसमोर बोलण्याची सवय असल्याने ते व्याख्याने झोडण्यात तरबेज असतात आणि श्रोत्यांना गुंडाळून व्यासपीठ काबीज करू शकतात. कितीही उच्च दर्जाचा ललित अथवा वैचारिक लेखक उत्तम वक्ता नसला तर सार्वजनिक ठिकाणी त्याचा प्रभाव पडत नाही आणि साहित्याच्या संस्थात्मक व्यवहारात त्याचा शिरकाव होऊ शकत नाही.

 ललित लेखना व्यतिरिक्त चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, इतिहास, वैज्ञानिक लेखन, टीका, समीक्षा, राजकीय अथवा सामाजिक विश्लेषणात्मक लिखाण हेही साहित्याचे एक अंगच आहे. पण या प्रकारच्या लेखनाला (काही) वाचकांच्या लेखी साहित्याच्या अंगणात प्रतिष्ठा नसते. मारुती चितमपल्लींना याच भूमिकेतून विरोध झाला होता आणि मीना प्रभूंना मला वाटते उमेदवारीच नाकारली गेली (या विषयी साशंक आहे.  कृ्पया चूकभूल देणेघेणे). या सर्वांचा जर साहित्यिकांमध्ये समावेश करायचा तर साहित्यव्यवहाराशी संबंधित अन्य क्षेत्रे, उदा. प्रकाशन,संपादन,संस्करण इ. क्षेत्रांतील लोकांनाही साहित्यिक का म्हणू नये असाही आक्षेप घेतला जातो.

ज्याच्या हातांत साहित्यचिरफाडीचा समीक्षारूपी धारदार सुरा आहे तोच आपले शस्त्र परजीत सर्वांना नामोहरम करू शकतो आणि अध्यक्षपदाच्या लढाईत बहुधा तोच विजयी होतो.