गाय उपयुक्त आहे यात वाद नाही. पण देव मानायचा असेल तर तो माणसापेक्षा श्रेष्ट असावा अशी माझी अपेक्षा आहे. एका पशुला तो मान का द्यायचा?

दुसरा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा की, गाईला देव मानू नका म्हणजे दिसली गाय की कापून खा असे  मुळीच नाही. एखाद्या प्राण्याला देवपदावरुन हटवले याचा अर्थ त्या प्राण्याला खायचे असा होतो का?
आपण कुत्री, मांजरे, घोडा यांना देव मानत नाही. पण सर्वसामान्य मराठी माणूस हे प्राणी खातो का? अजिबात नाही. शाकाहार हा भारतीय वंशाच्या लोकांकरता उत्तम आहार आहे तेव्हा निःसंकोच गोमांस सेवन करावे असे मी कुठेही म्हणत नाही. मात्र जर कुणी खाल्ले तर त्याने धर्म बुडवला, महापाप केले असे मी मानणार नाही.

  माझा मुद्दा हा आहे की गाईला ह्या प्राण्यांच्या तोडीचे समजावे. भारतात बाजारात, रस्त्यात, गर्दीच्या जागी कुणाला न जुमानता हे प्राणी ठिय्या देऊन बसलेले असतात आणि कित्येकदा गोभक्त त्यांच्या कपाळाला हात लावून नमस्कार करतात. गाय देव नसती तर असे न होता त्यांना तिकडून हाकलून दिले गेले असते.