उपक्रमाच्या दिवाळी अंकासाठी श्री. माधव गाडगीळांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने माझी आणि अदितीची खरी ओळख झाली. त्यानंतर बऱ्याचदा तिच्या कार्यालयातून निघाल्यानंतर बसमध्ये बसल्यानंतर ती मला फोन करत असे. मग तो फोन अगदी ती तिच्या घरच्या वळणावर पोचेपर्यंत चालू असे. बऱ्याच विषयांवर बोलणे होत असे.
अदितीचे हेच चित्र मनात टिकून राहावे असे मला वाटते. त्यानंतर इस्पितळात गलितगात्र झालेली, कसेबसे त्रोटक निरोप पाठवणारी अदिती , 'आता बरी आहे' असे फोनवर सांगणारी अदिती ... तिच्या मृत्यूची बातमी अगदी अनपेक्षित नसली तरी घशात आवंढा आणि डोळ्यांत पाणी आणणारी आहे. फोनमधील 'अदिती मनोगती' या नावावर साठवलेला तिचा क्रमांक, तिच्याबरोबर झालेला आंतरजालावरील काही पत्रव्यवहार, तिच्या अखेरच्या दिवसांत तिला भेटता न आल्याची आणि तिला खायला सांगितलेले काही पथ्याचे पदार्थ तिच्यासाठी नेता न आल्याची खंत... इतकेच आता शिल्लक आहे....