मनोगतासारख्या आभासी माध्यमाद्वारे किती जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊ शकतात, याचे अदिती हे मूर्तीमंत उदाहरण! ज्यावेळी मी मनोगताचे सदस्यत्त्व घेतले, त्यावेळी घरापासून, आप्तस्वकीयांपासून दूर असताना आणि ज्या मानसिक अवस्थेतून जात होतो ती असताना हवा असणारा आधार आणि जिव्हाळा अदितीकडून मिळाला. कोणत्याही विषयावर कितीही वेळ गप्पा मारायची, तिच्या ऑनलाईन असण्याची इतकी सवय झाली होती की गेल्या काही महिन्यांतली/वर्षांतली तिची अनुपस्थिती अस्वस्थ करणारी होती. माझ्या असंख्य, अनाकलनीय प्रश्नांना न कंटाळता कान देणे आणि माझी बडबड थांबल्यावर मला समजावणे - कधी गोड बोलून तर कधी कान पकडून - केवळ अविस्मरणीय. आयुष्यभर न मिळालेली मोठ्या बहिणीची माया गेली काही वर्षे तिच्या रुपाने मिळत राहिली; पण मोठी बहीण हिरावली गेल्याचं दुःख पुन्हा वाट्याला आलं, असा स्वार्थी विचार आता पाठ सोडत नाही.
अनेकदा प्रत्यक्ष भेट झाली; माझ्या लग्नातही ती जातीने हजर होती. फोनवरचे बोलणे आणि ऑनलाईन गप्पा यांची तर गणतीच नाही. मराठी आंतरजालावरच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही आता मोठी, भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली, हे नक्की. तिच्या कविता, लेखन, अनुवाद, रुसवे-फुगवे, वाद/भांडणे, जिव्हाळा सगळ्याला आता पारखा झालो :-(