अदितीच्या दुःखद निधनाची बातमी कळली आणि अतिशय अस्वस्थ वाटले. मी तिला एकदाच मीराताईंच्या आत्याच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात झालेल्या कार्यक्रमात २००६त भेटले होते. त्या नंतर फोनवर बोलणे होई. पण तिच्या आजारपणाबद्दल मात्र हल्लीच कळले होते. तेही इतके गंभीर असेल असे वाटले नव्हते. त्यामुळे बातमी धक्कादायक होती.
एक मृदू स्वभावाची, समंजस, लिखाणाची कमालीची समज असलेली मनोगती आपल्यातून अकाली काळाच्या पडद्याआड निघून गेली. चित्त यांनी दिलेली तिची २००७ मधली कविता वाचून अगदी गलबलून आले.
सुनीत सारखा काव्यप्रकार हाताळणारी अदिती ही माझ्यामते मनोगतावरील एकमेव कवयित्री. मध्यंतरी मनोगतावर जुन्या-जाणत्या मनोगतींचा वावर कमी झाल्यामुळे आलेली मरगळ दूर व्हावी म्हणून तिने संजोप रावांसोबत सर्वांना व्य. नि. पाठवून केलेले आवाहन आणि प्रयत्न मनोगती विसरणार नाहीत.
अदितीच्या कुटुंबियांचे आणि मनोगत परिवाराचे तिच्या जाण्याने झालेले नुकसान खरोखरच न भरून येणारे आहे. मी तिच्या दोन्ही परिवारांच्या दुःखात सहभागी आहे.
-छाया