माफ करा, पण संतती निर्मिती आणि भावी नागरिक निर्माण करणे हे लग्नाचे कारण नाही. टाळ्या घ्यायला हे वाक्य ठीक आहे.
संस्कारच करायचे तर ते इतरांच्या मुलांवरही करता येतील की. उलट लग्न करून तुम्ही एखाद दुसऱ्या संततीस जन्म द्याल व त्यांच्यावर संस्कार कराल पण अनेक जण ध्येय म्हणून आश्रमशाळा चालवीत आहेत, अनेक मुलांवर संस्कार करत आहेत. त्यासाठी लग्नाची काय गरज?
आदर्शवाद बाजूला ठेवा आणि नीट पाहा, किती जण आपल्या अपत्याने केवळ सुजाण नागरिक व्हावे असे प्रयत्न करतात? बहुतांश प्रजा आपली संतती नावलौकिक कमावेल, उच्चशिक्षित असेल, संपन्न होईल असे प्रयत्न करते. किती जण आपल्या संततीला सैन्यात जा असे सांगतात? किती जण आपल्या संततीला 'प्रपंचाऐवजी राष्ट्रकार्य कर' असे सांगतात? हे सोडा हो, किती जणांना असे वाटते की आपल्या मुलाला मोठेपणी आपण शिक्षक करावे आणि त्याने भावी पिढी घडवावी? प्रत्येकाला आपले अपत्य हे डॉक्टर, इंजिनियर, तंत्रज्ञ वा उच्चाधिकारपदस्थ असावे असेच वाटते.
माणूस लग्न का करतो या प्रश्नाचे उत्तर हवे असेल ना, तर उतार वयात पत्नी गेलेल्या एखाद्या पतीला पाहा वा पती गेलेल्या पत्नीला पाहा. तुम्हाला ते समजेल. पत्नी ही सहचरी, सखी असते. संततीनिर्मिती यंत्र नव्हे. माणसाला एका जवळच्या व निःस्वार्थी माणसाचा आधार हवा असतो. आई वडील जन्मभर पुरत नाहीत, भावंडेही दूर जातात तेव्हा पती आणि पत्नी हेच एकमेकाचे आधार असतात. अलीकडे मुले नोकरी निमित्त दूर जातात, आई वडील आपले घर सोडून त्यांच्याकडे जातातच असे नाही. मग त्या पती पत्नींना केवळ एकमेकाचाच आधार असतो.
लग्नाचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरसुख. पोटासारखी देहाचीही भूक असते. भूक भागवायला आपण दिसेल ते न खाता घरी स्वयंपाक करतो, खातो आणि सुसंस्कृतपणे आपली भूक भागवितो. त्याचप्रमाणे विवाह करून मनुष्य आपली देह भावना सुसंस्कृतपणे पुरी करतो. जेवण म्हणजे बका बका अन्न ओरपणे नव्हे तर त्याचा प्रसन्नपणे स्वाद घेत आपली क्षुधा तृप्त करणे. त्याचप्रमाणे दिसेल त्या स्त्रीच्या मागे लागून तिला ओरबाडण्यापेक्षा हक्काची स्त्री प्राप्त करून घेण्याचा प्रघात प्रगत मनुष्यजातीत पडला असावा, ज्यामुळे सुख तर मिळेल पण सामाजिक स्वास्थ्यही ढळणार नाही. जुन्या काळात स्वयंवर होत असत. म्हणजे आपला वर स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य स्त्रीला असावे ज्यायोगे भावी सहजीवन सुसह्य व चिरंतन असेल.