अदिती गेली. जाण्याचे वय नसताना, अवेळी, रांग मोडून पुढे निघून गेली. इथल्या काव्यशास्त्रविनोदाची संकुचित मैफल सोडून सरस्वतीच्या स्वर्गीय मैफलीचा आनंद घेण्यासाठी निघून गेली.

माझ्याही मनात अगदी याच भावना आहेत.

तिची मला सर्वात जास्त आवडलेली कविता इथे देतो.

------------शेवटाची.....------------

डोळियांना आस आहे शेवटाची
श्वास आता वाट पाहे शेवटाची

काळजाची विद्ध माझ्या लक्तरे ही
स्पंदनांची मंद भाषा शेवटाची

मैफिलीच्या पूर्णबिंबी चांद्ररात्री
भैरवीची आर्त जागा शेवटाची

रंगलेल्या पंगतीच्या तृप्त ओठी
केशराची एक काडी शेवटाची

पूर्ण झाले हातमागाचे उखाणे
मूक धागे गात गीते शेवटाची

काय दैवा तूच फासे खेळियेले
तेथ हो आरंभवेणा शेवटाची

वेदनेला या न थारा अंतरंगी
वेदनेची वंचना ती शेवटाची

मी कितीदा दूर केले मोहपाशा
वाटले की ही मिठी... ही शेवटाची

जीवना पूर्णता देते अर्थवाही
कोनशीळा नाममुद्रा शेवटाची

चिंतला नाही कधी मी देवसुद्धा
वाहिली जास्तीच चिंता शेवटाची....

--अदिती
१४.१२.०५