आपण बाजारात गाई उधळलेल्या पाहिल्या आहेत का? जेव्हा असे होते तेव्हा म्हातारे, बालके ह्यांचे काय हाल होतात कल्पना केली आहे का? जर अशा पशुच्या तावडीत एक दोन वर्षाचे बालक सापडले तर त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. मग गाईचे मोकाट भटकणे निरुपद्रवी कसे? त्यांचे पशुधर्माला साजेसे वाट्टेल तिथे मलमूत्र विसर्जन करणे आरोग्याला धोकादायक नाही का? कित्येक गाई उकिरडे फुंकतात. वाटेल ते शिळे सडके खातात. अशा गाईंचे शेण व मूत्र मोठे पवित्र असते असा आपला दावा आहे का? उघड्यावर विकत असलेल्या भाज्या व अन्नपदार्थांवर असल्या अमंगळ पदार्थाचा शिडकावा होणे आरोग्यदायक आहे का?
१. गाईचे स्वच्छंद हिंडणे हे माणसाच्या जीवापेक्षा, आरोग्यापेक्षा महत्त्वाचे आहे का?
२. भारतीय लोक गायीला देव मानतात हे जाणणारे धूर्त मालक गाईला बिनदिक्कत बाजारात सोडतात. कारण त्यांचा चाऱ्याचा पैसा वाचतो आणि गोठ्याची जागाही. म्हशी अशा सहसा मोकाट दिसत नाहीत असे का?