आदित्यांविषयी खाली दिलेली माहिती "भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोष (खंड १)"मधून उतरवलेली आहे.
वैवस्वत मन्वंतरातील एक देवतासमूह... वैदिकोत्तर साहित्यामध्ये बारा आदित्य म्हणजे बारा महिन्यातील बारा सूर्य असे समीकरण रूढ असले तरी ऋग्वेदात मात्र तसा सुस्पष्ट निर्देश आढळत नाही.
ऋग्वेदात--या समूहातील देवतांच्या संख्येबद्दल आणि नावांबद्दल ऋग्वेदात परस्परविरोधी विधाने आढळतात. आदित्यांची संख्या या ग्रंथात एके ठिकाणी सात (ऋ. ९.११४.३), आणि एके ठिकाणी आठ (ऋ. १०.७०.८) दिली आहे. अदितीचे आठ पुत्र म्हणजे आठ आदित्य होत, असा स्पष्ट निर्देश तेथे केला असून यापैकी अंतिम पुत्राचे नाव मार्ताण्ड दिले आहे.
ऋग्वेदातील अन्य एका सूक्तामध्ये आदित्यांची संख्या सहा दिली असून त्यांची नामावली पुढीलप्रमाणे दिलेली आढळतेः- १. मित्र, २. अर्यमन् , ३. भग, ४. वरुण, ५. दक्ष, ६. अंश (ऋ. २.२७.२).
अशा तऱ्हेने आदित्यांची संख्या ऋग्वेदकाळी सर्वप्रथम सहा होती आणि त्यामध्ये सूर्य व मार्ताण्ड या देवतांची भर घालून ती आठ झाली असावी.
अथर्ववेदात-- या ग्रंथात अदितीच्या आठ पुत्रांचा निर्देश असून (अ. वे. ८.९.२१), तैत्तिरीय ब्राह्मणात या अष्टादित्यांची नामावली पुढीलप्रमाणे दिली आहेः- १. मित्र, २. वरुण, ३. अर्यमन्, ४. अंश, ५. भग, ६. धातृ, ७. इंद्र, ८. विवस्वत् (तै. ब्रा. १.१.९.१). यापैकी प्रथम पाच आदित्यांचा निर्देश केवळ ऋग्वेदान्तर्गत नामावलीत आढळत असून उर्वरीत तीन देवतांची नावे ऋग्वेदोत्तर काळामध्ये समाविष्ट करण्यात आली, असे दिसते.
ऋग्वेदाच्या सायणभाष्यातही (ऋ. २.२७.१) उपरोक्त अष्टादित्यांची नामावली पुन्हा उद्धृत केली आहे.
शतपथ ब्राह्मणात-- अदितीचा अष्टम पुत्र मार्ताण्ड हा जमेस धरून आदित्यांची संख्या आठ होत असल्याचा निर्देश या ग्रंथात आढळतो (श. ब्रा. ६.१.२.८). याच ग्रंथात अन्यत्र बारा आदित्य सांगितले असून ते बारा महिन्यांचे निदर्शक असल्याचा निर्देश तेथे केला आहे (श. ब्रा. ११.६.३.८). वेदोत्तर वाङ्मयात बारा महिन्यातील सूर्यदेव म्हणजे बारा आदित्य होत, हे समीकरण सर्वमान्य असून त्यामध्ये श्रीविष्णूला सर्वश्रेष्ठ आदित्य मानले आहे.
ऋग्वेदात आणि मैत्रायणी संहितेत इंद्राचा निर्देश आदित्य म्हणून केला आहे (ऋ. ७.८५.४; मै. सं. २.१.१२). परंतु शतपथ ब्राह्मणात मात्र बारा आदित्यांहून इंद्र निराळा दिला आहे (श. ब्रा. ११.६.३.५).
पौराणिक साहित्यात-- या ग्रंथात आदित्यांची संख्या बारा दिली ... आहेः १. अंशुमत् (अंशु, अंश), २. अर्यमन्, ३. इंद्र, ४. त्वष्टृ, ५. धातृ, ६. पर्जन्य, ७. पूषन्, ८. भग, ९. मित्र, १०. वरुण, ११. विवस्वत्, १२. विष्णु (उरुक्रम)
स्कंद पुराणात-- या ग्रंथात द्वादशातित्यांची नामावली निम्नप्रकारे दिली आहेः- १. लोलार्क, २. उत्तरार्क, ३. सांबादित्य, ४. द्रुपदादित्य, ५. मयूखादित्य, ६. अरुणादित्य, ७. वृद्धादित्य, ८. केशवादित्य, ९. विमलादित्य, १०. गंगादित्य, ११. यमादित्य, १२. सकोलादित्य (स्कंद. वैष्णव. ४.४६).