खरे तर ह्या चर्चेत मी पडणार नव्हतो, कारण अशा स्वरूपाच्या  चर्चा मागे अनेकदा होऊन गेलेल्या आहेत. पण प्रोफेसरांचा हा प्रतिसाद फारच गोंधळात टाकणारा आहे.

सर्वप्रथम, बोलीभाषा म्हणजे डायलेक्ट, पोटभाषा. गझल शक्यतो पोटभाषांमध्ये असावी असे "जाणकार" म्हणतात असा प्रोफेसरांचा दावा आहे का? की ती नेहमीच्या, संवादात्मक भाषेत असावी असे म्हणायचे आहे? आणि तसे म्हणायचे असल्यास व्यवस्थित संदर्भ दिले असते तर बरे झाले असते. जुन्या काळातील नव्या नवरीप्रमाणे नाव घ्यायला लाजण्यात काय हशील?

दुसरी गोष्ट म्हणजे, गझल संवादात्मक, नेहमीच्या बोलण्याच्या भाषेत असणे (देवपूरकरांच्या शब्दात, बोलीभाषेत) आणि ती बोलकी असणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी झाल्या, समानार्थी नाहीत. प्रोफेसरांच्या प्रतिसादातून मात्र तसे ध्वनित होते आहे.
खादाड झालो
मी जाड झालो
हा वानगीदाखल पाडलेला "शेर" साध्या, संवादात्मक भाषेत आहे. म्हणून काय त्याला बोलका म्हणायचे?

"शेर सहज, सोपे, थेट, गोटीबंद, डौलदार, आशयगर्भ व व्यामिश्र असल्यास गझलेत गंमत येते!"
अर्रर्र, केवढा हा विशेषणांचा पाऊस! पण व्यामिश्रता आली की आपोआप कमीअधिक संदिग्धता आलीच. मग सोपेपणा व थेटपणाला छेद जातो त्याचे काय? त्यात शेर जितका आशयगर्भ तितके त्यास अर्थाचे पदर. पुन्हा सोपेपणा व थेटपणा धोक्यात!   

'इन्सान' हा अमराठी शब्द प्रोफेसरांनी शेरात वापरला, व ही चूक/सूट महेश ह्यांनी दाखवली. मराठीत माणसासाठी '... (आ)न' असा यमक जुळणारा व अलामत पाळणारा कोणताही शब्द नाही, व इन्सान हा परभाषिक शब्द सर्व मराठी भाषकांना ज्ञात आहे; त्यामुळे थोडी सूट घेऊन तो वापरला; एवढा खुलासा पुरेसा झाला असता. गोंधळ वाढवणाऱ्या इतक्या कोलांट्या व शाब्दिक कसरती कशासाठी?