या सर्वांना खरे तर परिकथा म्हणण्यापेक्षा लोककथा म्हणणे जास्त समर्पक ठरेल. त्यात पऱ्या, चेटकिणी, भुते, देवदूत यांची सरमिसळ असते. आपल्या पुराणांतही अशाच कथा असतात आणि त्या मुलांनाही सांगितल्या जातात, फक्त त्यातला अतिक्रूर आणि लैंगिक भाग वगळून. मला स्वतःला लहानपणी भक्त प्रह्लाद किंवा चिलया बाळाची गोष्ट मुळीच आवडत नसे. सावत्र आई कुणाला तरी चटके देतेय, कुणाचे तरी डोळे फोडतेय अशी वर्णने आवडत नसत. किंबहुना दुष्ट सावत्र आईची कल्पना या गोष्टींमुळेच मनात ठसली. नंतर जुन्या वाङ्मयातली उघडीवाघडी लैंगिक वर्णने सामोरी आली. अगदी धार्मिक समजल्या जाणाऱ्या साहित्यातही असलेले लिंगाचे, शिस्नाचे थेट उल्लेख खटकत असत. पण नंतर वाटू लागले की हा थेटपणा, रांगडेपणा त्या काळाचा स्थायीभाव होता. हजारों वर्षांपूर्वी कदाचित सर्वांना पुरेसे वस्त्र मिळत नसेल, वस्त्रनिर्मिती सोपी आणि मुबलक नसेल. कातडेही सहज उपलब्ध नसेल‌. शरीर उघडे राहत असेल. त्यात लपवण्याजोगे असे काहीच नसेल. शिवाय इतरही सर्व शारीरिक गोष्टींमध्ये फारशी गुप्तता नसेल. गधेगाळीचे शाप उघडपणे लिहिलेले, कधीक्वचित चित्रित केलेलेही आपण पाहतो. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत खेडोपाडी हरिजन आणि आदिवासी लोक अर्धनग्न किंवा नग्न असत, कमरेला जाड सुंभात अडकवलेला एक कोयता मात्र असे. फार वर्षांपूर्वी उषेविषयीचे उल्लेख वाचताना एका ठिकाणी 'ताज्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे तांबूस दिसणारी उषा', किंवा आणखी एका ठिकाणी 'रजस्वलेच्या वस्त्राप्रमाणे दिसणारी उषा' इथे थबकायला, अडखळायला झाले होते. इतक्या दूरचे कशाला,  सुमा करंदीकरांच्या 'रास' ह्या आत्मचरित्रांतला (ते खरे तर विंदांचेच चरित्र आहे.)एक उल्लेखही असाच चकित करून गेला होता. पूर्वी मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रिया कपडे घेत नसत, असा तो उल्लेख होता.  भर सभेत विनवण्या करणारी द्रौपदी सर्र्कन आठवून गेली होती. मग दिवस भरत आलेल्या सीतेला घनदाट अरण्यात सोडून देणे हेही असेच चटका लावून गेले होते. दासबोधातली 'मूल आडवे आले, ते खांडोनी काढिले' ही ओवी वाचल्यावर तर रात्रभर झोप आली नव्हती. जन्मण्याच्या अवस्थेतल्या बाळाला करवतीने कापून काढणे ही कल्पनाच किती भयंकर आहे! पण त्या काळी असे करावे लागत होते. त्यातले पारंगत लोकही होतेच असतील. जन्म-मृत्यू ही सहज आणि वारंवार घडणारी गोष्ट होती. जन्मदर आणि मृत्युदर दोन्ही मोठेच होते. पत्नीच्या मृत्यूनंतर तेराव्या दिवशीच दुसऱ्या लग्नाच्या खटपटीला लागणे हेही अगदी सहज होते. संस्कृतीच्या बाल्यकाळात क्रौर्य हा सहजस्वभाव होता. त्यामुळे लोककथांतूनही त्याचे प्रतिबिंब उमटत राहिले.