देव फारसे न मानणे म्हणजे काय ते कळाले नाही. देव मानणे किंवा न मानणे एवढेच पर्याय असतात असा माझा समज होता. 'आपण देव मानतो' हे स्वच्छपणे कबूल करण्यात कमीपणा वाटणारे लोक 'तसा/शी मीही रॅशनल आहे, पण काहीकाही वेळा वाटतं बुवा... की ..अं..आपल्यावरही एखादी शक्ती आहे... मग तुम्ही तिला देव म्हणा की म्हणू नका.. ' असली गुळमुळीत भूमिका घेत असतात. दुःखाचा मुकाबला करण्यासाठी देव, श्रद्धा, भक्ती यांची मदत घेणे यापलीकडे देवाचा तरी अपमान काय असणार? 'मी तुला भक्ती देतो, तू मला दुःखे सहन करण्याचे बळ दे' हा सौदा मंजूर करणारा देव थोर, आणि असे देवाला पटवणारे भक्त तर सात थोर. दुःखाचे म्हणाल तर स्वतः तथाकथित देवही त्या दुःखचक्रातून सुटलेला नाही. त्यामुळे आगामी दुःखांपासून संरक्षण मिळावे म्हणून आधीच भक्तीची लस टोचून घेणे अविवेकीपणाचे आहे. तरुण मुलाच्या निधनाचे दुःख पचवूनही 'ऐंशी वर्षांच्या आयुष्यात एकदाही देवाचे अस्तित्व जाणवले नाही' असे जाहीरपणे म्हणणारे डॉ. श्रीराम लागू मोठे वाटतात ते त्याचमुळे. आणि 'हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यांची आहे ना श्रद्धा, त्यांना मानू द्या तसे. तुम्हाला नसेल मानायचे, नका मानू.. ' या तथाकथित समंजस बोटचेपेपणामुळे तर समाजाचे अपरिमित नुकसान झाले आहे.