कवितेत जाणवणारी अंधश्रद्धा ही जराशी चिंताजनक वाटली. विशेषतः चैत रे चैत ने म्हटल्याप्रमाणे एका शिक्षकाकडून. तरीही या कवितेवर जी प्रचंड जहाल टीका होत आहे ते कुठेतरी पटली नाही.
मला विशेषतः जे खटकले ते म्हणजे सर्व प्रश्नांना तार्किक/वैज्ञानिक मार्गाने उत्तरे शोधण्याच्या मार्गावर असलेला (माझ्या मते अंध) विश्वास. असे कितीतरी प्रश्न आपल्या समोर असतात ज्यांना तार्किक उत्तरे असू शकत नाहीत. (अगदी साधे उदाहरण म्हणजे बायकोला वाढदिवसाला कोणती भेट द्यावी. ) जर असे असेल तर ईश्वर तत्त्वावरील श्रद्धा आणि तदनुषंगिक मानवी वर्तन हा विषय तर्काच्या चौकटीत का बसला पाहिजे हे मला कळत नाही. माझा इथे तर्कबुद्धी वापरण्यास संपूर्ण विरोध आहे असे नाही तर ती वापरून मिळालेली उत्तरे संपूर्ण खरी आहेत असे मानण्याला आहे. विशेषतः मानवी वर्तनाबाबतीत हे अनेकदा दिसते की अनेकदा तर्काला सोडून वर्तन केले जाते आणि ते अंतिमतः बरोबर ठरते.
चैत रे चैत यांनी दिलेली कारणांची यादी मूळ दुःखांच्या यादीपेक्षाही लांबलेली आढळते. आणि तरीही ही यादी सर्वसमावेषक आहे असे म्हणता येत नाही. जर असे असेल तर सर्व तार्किक घटक लक्षात घेतल्यावर उरलेल्या परिणामांसाठी श्रद्धेचे "empirical model" वापरले तर आक्षेप का असावा. किंवा असलाच तर तो सकारात्मक असावा. मला कारण कळत नाही पण तुम्ही म्हणता ते नक्की नाही या म्हणण्यामागे काय तर्कबुद्धी आहे?
शेवटी : मी आस्तिक आहे आणि मी हे स्वच्छपणे कबूल करण्यास अजिबात लाजत नाही. मी स्वतःला तर्कग्राही (rational) मानतो पण तर्कशास्त्रासही मर्यादा आहेत असे मानतो.