कोणत्याही गोष्टीला, घटनेला तर्काची, विवेकाची आणि अगदी ढोबळपणे लिहायचे तर विचारांची कसोटी लावून त्यानुसार आपली प्रतिक्रिया देणे किंवा तर्काचा विचार न करता अंतर्मन, भक्ती, श्रद्धा - काय असेल ते- त्याला प्रमाण मानून त्यानुसार वागणे या 'आहे रे' आणि 'नाही रे' - 'हॅव्ज' आणि 'हॅव नॉटस' सारख्या 'म्यूच्वली एक्सक्लुजिव्ह' घटना आहेत असे माझे मत आहे. मी काही बाबतीत तर्क वापरतो आणि काही बाबतीत वापरत नाही असे प्रत्यक्षात - अगदी ठरवूनही- करता येईल काय? विषय श्रद्धा, अंधश्रद्धा असा चालला आहे, तर मी मारुतीला देव मानतो, पण गणपतीला मानत नाही, मी सत्यसाईबाबांचा भक्त आहे पण कुठल्याशा माता-त्या ढोंगी आहेत असे माझे मत आहे- असे असेल तर ते वर्तन खरे मानायचे काय?
आणि थोडेसे जहाल वगैरे टीकेविषयी. 'भले तरी देऊ' म्हणणाऱ्यांनीच पुढे 'नाठाळांचे माथी' म्हटले आहे. 'मऊ मेणाहुनि' असणारे त्याच ओळीत 'प्रसंगी वज्रास भेदण्याची' भाषा करतात. एखाद्या गोष्टीने एखाद्या माणसाचे नव्हे तर एकूण समाजाचे प्रचंड नुकसान होते आहे-झाले आहे- असे ज्यांना वाटते त्यांनी टीका वगैरे करुच नये- मतभेदच असतील तर ते वाटाघाटी, चर्चा करून मवाळपणे सोडवावेत अशी अपेक्षा असू नये. दिल्लीत झालेल्या घटनेतील दोषी व्यक्तींना माफ करून - त्यांच्या मनांचे परिवर्तन करून त्यांना शिक्षा द्यायचीच तर पवनारच्या आश्रमात गोमयाने खोल्या सारवण्याची पवित्र शिक्षा द्या- शेवटी आपण सगळेच एकाच भूमाऊलीची लेकरे वगैरे असेच म्हटल्यासारखे वाटते. हे जरा अतिच जहाल झाले, क्षमस्व.