प्रोफेसर -
काव्याचा प्रकार 'गझल' असा निवडला आहे त्यामुळे ही रचना/ हे काव्य नाही आवडले.

विसकटलेली घडी बसवती समर्थ स्वामी!
प्रत्येकाची धुरा वाहती समर्थ स्वामी!!
या पहिल्या द्विपदीमध्ये विसकटलेली घडी बसवणे आणि 'प्रत्येकाची' धुरा वाहणे याचा एक दुसऱ्यांशी संबंध लागला नाही. प्रत्येकाची हा शब्द खटकत आहे. आणि जर विसकटलेली घडी बसवणे हेही जर प्रत्येकाच्या बाबतीत असेल तर ही द्विपदी म्हणजे एक साधे सरळ विधान वाटत आहे. गझलेच्या शेरातील दोन्ही ओळी परस्परविरोधीच असणे गरजेचे नाही हे माहीत आहे परंतु दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध लावल्यावर मनाला फारसे भिडले नाही. विशेष असे काही जाणवले नाही.

राखेमधुनी सुद्धा गावे उभी राहती!
तुटलेले संसार वसवती समर्थ स्वामी!

या द्विपदीमध्येही राखेमधुनी गावे उभी राहती असे म्हटलेले आहे. एखाद्या गोष्टीची राख होणे ( इथे तर अख्ख्या गावाची) म्हणजे संपूर्ण बरबादी होणे, सर्वनाश होणे असा अर्थ निघतो असे मला वाटते. या द्विपदीच्या पुढील ओळीत मात्र त्याचा संबंध तुटलेल्या संसारांशी लावला आहे. तुटलेला संसाराला अनेक छटा आहेत पण अगदी राख होणे असा अर्थ त्यातून ओढून ताणूनच निघू शकतो.

रचना मात्रावृत्तात आहे पण लयीत म्हणताना त्रास होतो आहे. एकंदरीतच वरील रचना गझल म्हणून भावली नाही. भक्तिगीत/ भावगीत म्हटल्यास चालू शकेल.

अनेक प्रख्यात गझलकारांच्या ( उर्दू/मराठी) गझलांमध्ये चंद्र/तारे/तारका/क्षितिज यांच्या काहीबाही उपमा दिलेल्या असतात, शास्त्रीयदृष्ट्या त्या हास्यास्पद वाटतात. त्या गोष्टी पाटल्या नाहीत तरी त्या काव्याला/शब्दयोजनेला दाद दिली जाते. वरील लेखन काव्य/गझल या प्रकारातील असल्याने तेवढाच प्रतिसाद द्यावा वाटला. देव मानावा की नाही त्यातून तो एका (विज्ञानाच्या) प्राध्यापकाने मानावा व त्याचे समर्थन करावे की नाही हा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो.