मराठीप्रेमीताई,

वास्तविक जीवनात माणूस इतका तर्कदुष्ट, परफेक्ट नसतो ना! जीवनशैलीत विपरीत बदल होतात, व्यायाम अगदी होत नाही, घरच्या विवंचना पाठ सोडत नाहीत, मोह होतात....आणि मग त्याचे परिणाम पुढे आले की मात्र तंतरते. असे अगदी घरोघरी असते ना!

वास्तविक जीवनात माणूस इतका तर्क'दुष्ट'(?), पर्फेक्ट नसतोच. जीवनशैलीत होणारे बदल, व्यायामाचा अभाव, घरगुती मानसिक ताणतणाव ही फार थोडी कारणे झाली. मी दिलेली यादी ही मूळ दुःखांच्या यादीपेक्षा मोठी आहे कारण ती केवळ शक्यतांची यादी आहे; आणि म्हणूनच ती सर्वसमावेशक नाही आहे. त्या यादीत उल्लेखिलेल्या कारणांमुळे प्राप्त होणाऱ्या दुःखांमुळे, त्या कारणांच्या परिणामांमुळे आपली 'तंतरते' हे खरे. तरी देखील  त्या दुःखांच्या निवारणासाठी देव, दैव आणि श्रद्धा ह्या गोष्टी कशा काय साहाय्यभूत ठरतात हे समजले नाही. आपली 'तंतरणे' आणि त्या दुःखांचे निवारण ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. तसे नसल्यास ही माझ्या बुद्धीची मर्यादा समजतो. आपण कृपया सोदाहरण समजावून द्यावे ही विनंती.

अगदी बाबा आदमच्या ज़मान्यातील (क्लीशे प्रकारात मोडणारे) उदाहरण द्यायचे झाल्यास पूर्वी 'देवी' हा रोग देवीच्या कोपामुळे होतो असा समज होता. परंतु  गेल्या ३-४ पिढ्यांतील कोणालातरी देवी झाल्या आहेत का? माणसाच्या शरीरात होणाऱ्या विपरीत बदलांवरील उपचार एके काळी माहीत नसल्याने तो जरी देवा/वीचा कोप समजला गेला होता तरी आता केवळ तो एक साधा रोग आहे आणि त्यावर उपचार होऊ शकतात हेच ठाऊक आहे असे नाही तर त्या रोगाचा समूळ नायनाट झाला आहे. केवळ श्रद्धा ठेवल्याने कोणाच्या देवी बऱ्या झाल्या का?

आणि माणसाच्या मनाचे खेळ तर अजून अगम्य! बरोबर काय आणि चूक काय समजेनासे होते. 

माणसाच्या मनाचे खेळ अगम्य खरे. पण ज्याप्रमाणे शारीरिक रोगांबाबत संशोधन होऊन त्यावर उपचार निघाले तद्वतच मानसिक आजारांबाबत देखील संशोधन सुरूच आहे आणि असते. काही वर्षांपूर्वी मला स्वतःला व्यावसायिक जीवनात थोड्याशा अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे माझ्या व्यक्तिगत आयुष्यात देखील मला काही अडचणींना सामोरे जावे लागले होते. तेव्हा एका मनोविकारतज्ज्ञांची भेट घेऊन मी त्या प्रश्नांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आणि तो बह्वंशी यशस्वी झाला. (मनोविकारतज्ज्ञाकडे उपचारासाठी जाणाऱ्या माणसाला वेडच लागले आहे असे आपल्याकडे दुर्दैवाने समजले जाते. ही प्रवृत्ती, हा विचार बदलण्याची गरज आहे. पण तो मुद्दा निराळा.)

यात काय देवाचा अपमान? आपल्या लेकरांचे होईल तितके संरक्षण करणे त्याचे कर्तव्यच नाही का? मूल हट्टाने काही मागणारच!

देवाच्या अपमानाच्या बाबतीत मी सन्जोपरावांशी असहमत आहे. जर देवच अस्तित्वात नाही तर अपमान तरी कोणाचा होणार हे कळत नाही. त्यामुळेच ह्या संदर्भात आपण कोणाची मुले आहोत आणि कोणाकडे हट्टाने काय मागतो आहोत हे कळत नाही.