विसंगती म्हणाल तर ती पदोपदी आढळते. सर्वांभूती परमेश्वर असल्याच्या वल्गना करणारेच स्थानमाहात्म्याविषयी प्रवचन देत असताना आढळतात. (ज्या लोकांनी मला नामदेवांची 'सर्वांभूती परमेश्वर आहे' ही गोष्ट सांगितली (नामदेवांचीच ना हो ती गोष्ट? 'नामदेव एकदा शंकराच्या देवळात पिंडीवर पाय ठेवून झोपलेले असतात. ते पाहून पुजारी म्हणतो, "असा कसा हा संत माणूस? पिंडीवर पाय ठेवतं का कोणी?" असे म्हणून तो नामदेवांचे पाय दुसरीकडे ठेवतो तर तिथे नवीन पिंड उगवते.' अशी काहीशी गोष्ट आहे ती.) तेच लोक स्थानमाहात्म्य म्हणून देवळात जातात. तेच लोक देवाकडे पाय करून झोपू नकोस असे सुनावतात.)

भगवद्गीता कर्मयोगाचा धडा देते म्हणून तिची पूजा करणारे लोकच आपापला कामधंदा सोडून रामनामाच्या वह्या लिहिताना आणि जपमाळ ओढताना दिसतात.

अहो, आपली श्रद्धा, आपले अध्यात्म म्हणाल तर इतकी ना ना तऱ्हेची ढोंगे आढळतात त्यात. अथर्वशीर्षाच्या सहस्रावर्तनांसाठी पुरेशी माणसे आणि पुरेसा वेळ नसल्याकारणाने 'फलश्रुती'चा उपाय सांगून भर चौकात कर्ण्यावर अथर्वशीर्षाची ध्वनिफीत लावलेली मी पाहिली (ऐकली) आहे. म्हणे हे अथर्वशीर्ष दहादा वाजवूयात, शंभर माणसे तरी ऐकतील म्हणजे झाली हजार आवर्तने! इथे प्रत्येक गोष्टीसाठी पळवाट... 'वस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि।', 'दधिस्नानार्थे अक्षतान् समर्पयामि।' आणि 'सर्वार्थे अक्षतान् समर्पयामि।' देव ही संकल्पनाच मुळी एक पळवाट म्हणून आली. त्या देवाला खूश ठेवण्यासाठी अजून पळवाटा न निघत्या तरच आश्चर्य.

हे स्वतःला श्रद्धाळू, आध्यात्मिक म्हणवून घेणारे पक्के ढोंगी असतात. शंकराचार्यांच्या चर्पटपञ्जरिकास्तोत्रातील 'नारीस्तनभरनाभिनिवेशं मिथ्या माया मोहावेशम्। एतन्मांसवसादि विकारं मनसि विचारय वारंवारम्।' (संस्कृत न जाणणाऱ्यांसाठी ढोबळ अर्थ - नारीचे स्तन/नाभी पाहणे ही मिथ्या माया आहे, केवळ मोह आहे. हे शारीर आकर्षण केवळ एक विकार आहे. (आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही हे) तू स्वतःच्या मनाला वारंवार विचार.) हा श्लोक नेहमी म्हणणाऱ्या लोकांना मुले होतातच कशी असा मला प्रश्न पडतो.

परमेश्वराचे नाम सतत घ्या, त्यात खंड पडू देऊ नका असे म्हणणारे लोकच उपासतापासाचे महत्त्व सांगत असतात. पोषणात खंड पडून शरीरावर त्याचे विपरीत परिणाम झाले तरी चालतील पण परमेश्वराचे नाम सतत घ्या. मग त्याच शारीरिक व्याधींसाठी पुन्हा परमेश्वराला साकडे. आणि म्हणे >> जो प्रत्यक्ष भोगत असतो त्यालाच ते कळतं.. आणि अशा वेळी त्याला एका श्रद्धेचा, आधाराचा हात खूप बळ देतो.

गोरगरीबांना अन्न मिळत नसताना आपला तथाकथित देव मात्र दुग्धस्नान आणि दधिस्नान करत असतो. देवाला 'मला परीक्षेत पास कर' असे कधीच 'न' सांगणारे, फक्त इतरांसाठी चांगल्या गोष्टी मागणारे तथाकथित सच्चे श्रद्धाळू आणि सच्चे भक्त देवाची महापूजा करायला दहादहा हजार रुपये भरायला मागेपुढे पाहत नाहीत.

असे ढोंग (कोणाच्या भावना न दुखावणारा शब्द हवा असेल तर विसंगत आचरण म्हणा) सर्वत्र आढळते. अशा लोकांसाठी देवाचा अपमान करणे काही विशेष नाही. अहो जिथे 'देवाचा देव बाई ठकडा' असतो तिथे त्याच्या भक्तांची काय कथा? आपण कितीही कंठशोष केला तरी काही देखील फायदा नाही.