कोणत्याही गोष्टीला फक्त तर्काची कसोटी लावणे किंवा फक्त श्रद्धेस प्रमाण मानणे हे दोन मार्ग निश्चित असतात. काही लोक कधीकधी अर्धवट तर्कमार्गही स्वीकारतात. या लोकांना कदाचित सोयिस्कर तर्कग्राही म्हणता येईल. संजोप रावांच्या म्हणण्याप्रमाणे हा तिसरा घटक कदाचित अस्तित्वात नसेलही. माझा मर्यादित तर्कग्राहीत्वाचा मुद्दा हा अशा कसोट्यांमधून मिळालेली उत्तरे प्रत्यक्ष व्यावहारिक जगातील अनुभवांना लावण्याबाबत आहे. जेव्हा आपल्या श्रद्धास्थानाकडून मिळणारी उत्तरे अनुभवाच्या कसोट्यांवर बसत नाहीत असे दिसल्यावर ते श्रद्धास्थान सोडून देण्याची अपेक्षा केली जाते तेव्हा तशीच अपेक्षा तार्किक कसोट्यांकडून चुकीची अथवा असमाधानकारक उत्तरे मिळाल्यावर अशा कसोट्यांबद्दल का असू नये? किंवा एखादी गोष्ट तर्कसंगत वाटत नसल्यास त्यामागे काहीतरी तर्क असलाच पाहिजे ही एक प्रकारची श्रद्धाच नव्हे काय?
जहाल टीका अशासाठी वाटली की आपणास न पटलेला विचार हा थेट बुरसटलेला वगैरे आपणास वाटला. आपणच म्हटल्याप्रमाणे गझलकार हे एक प्राध्यापक आहेत. तेव्हा इथेतरी चर्चा वाटाघाटींना हरकत नसावी. आणि समाजाचे प्रचंड नुकसान होते आहे असे तुम्हाला वाटले म्हणजे ते तसे झाले असे नाही (नाही असेही नाही, तुमचे वाटणे ही एकमेव कसोटी नाही एवढेच म्हणायचे आहे. या विशिष्ट उदाहरणात तुमचे कदाचित बरोबरही असेल). तेव्हा संशयाचा फायदा देऊन मवाळ चर्चांना प्राधान्य दिले गेले पाहिजे असे मला वाटते.