या चर्चेतून ३ मुख्य मुद्दे समोर येतात
१. तेंव्हा काय होते? का होते?
२. आता काय आहे? काय हवे?
३. नक्की काय अभिप्रेत आहे?
===
१. तेंव्हा
तेंव्हा काय होते? काय झाले? हा चर्चेसाठी छान विषय आहे पण वर्तमानकाळातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यात असतीलच असे नाही. एखाद्या कृती/घटना/रूढी च्या मागची मानसिकता समजायला मात्र निश्चित मदत होईल.
गायीच्या अर्थशास्त्रीय महत्त्वामुळे गायीला देवत्व प्राप्त झाले यावर सामान्यतः एकमत दिसते. चांगली गोष्ट आहे.

यावर थोडा पुढे जाऊन विचार केला तर असे लक्षात येईल की समजा..‌. समजा हिंदू धर्म/परंपरा मध्यपूर्वेत जन्माला आली असती तर आज जे महत्त्व गायीचे आहे ते उंटाचे झाले असते, टुंड्रा प्रदेशात असती तर रेनडीयरचे झाले असते, पाण्याखाली असती तर कदाचित देवमाश्याचे झाले असते. त्यामुळे गायीचे महत्त्व हे भारतीय उपखंडासाठी विशेषकरून लागू होते असे वाटते.

२. आता
आता या देवत्वामागे असलेले जे मूळ अर्थशास्त्रीय कारण आहे ते बदलले आहे. जरी भारत आजमितीला कृषिप्रधान देश आहे, तरी शेतीसाठी बैलांचा वापर कमी झाला आहे. भारतात आज डझनभर ट्रॅक्टर उत्पादक आहेत. (मोटारगाड्यांशी तुलना करून पाहा!)
भारतात गायीपेक्षा म्हशीच्या दुधाचा वापर जास्त होतो हे माझे सामान्य (संशोधनपूर्वक नाही) निरीक्षण आहे. जरी नैसर्गिक, भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या बैलाने शेती करणे (किमान भारतात तरी) शहाणपणाचे दिसते असले तरी ते शेतकऱ्यांच्या गळी उतरवणे अवघड काम आहे.

३. नक्की
गायीच्या देवत्वातून नक्की काय अभिप्रेत होते? ... अर्थशास्त्रीय दृष्टया महत्वाच्या प्राण्याची राजरोस कत्तल होऊ नये. आणि शेतीचे महत्वाचे साधन(बैल) देणाऱ्या "यंत्राचा" तुटवडा पडू नये म्हणून.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. याचा झटका एकदा नाही तर चांगला दोन वेळा हिंदू धर्माला बसला आहे... जैन आणि बौद्ध धर्मांची/पंथांची स्थापना. सनातन धर्मातली कर्मकांडे इतकी वाढली होती की काही लोकांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्यांचे वेदांचे आधिपत्य धुडकावून लावले.

आजही गायीचे देवत्व टिकून आहे. एका अर्थाने चांगलीच गोष्ट आहे. पण मग ब्राह्मणांचे देवत्व का नाही टिकले? कारण बदललेल्या समाजरचनेत जातीचे महत्त्व तितकेसे राहिले नाही. तसेच आजच्या बदललेल्या अर्थकारणात गायबैलांचे "तेंव्हा" होते तेव्हढे महत्त्व राहिले नाहीये हे सत्य आहे.

हिंदू धर्मात फक्त गाय या एकाच प्राण्याची देव म्हणून पुजा होते का? नाही. सापाची पण होते. पण मग घरात साप निघाला तर त्याला आपण ठेचतो का पुजा करतो?

मासा, कासव, वराह हे साक्षात श्री विष्णूचे अवतार मानतो. मग म्हणूनच आज अनेक हिंदू मत्स्यावताराची पोटपूजा बांधतात का?

गावात डुकरांचा त्रास होऊ लागला की आपण त्यांची काय विल्हेवाट लावतो?

रस्त्यात शेण-मूत्र सोडणाऱ्या गायीची पुजा आणि ते स्वतः खाऊन परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या वराहावताराच्या भाळी सक्तीचा मृत्यू, यात काही चुकते आहे असे वाटत नाही का?
===
कोणे एके काळी असलेल्या समाज आणि अर्थ रचनेमुळे गायीला महत्त्व आणि कालांतराने देवत्व प्राप्त झाले. त्यातल्या देवत्वाचा आंधळेपणाने स्वीकार न करता, आणि अतिटोकाची विज्ञाननिष्ठ भूमिका न घेता या प्रश्नाकडे बघता येईल असे मला वाटते.

हिंदू धर्मात गायीला महत्त्व आहे आणि ते एका शतकात निघून जाईल अशी भीती आणि ते जावं असा अट्टाहास दोन्ही चुकीचे आहे असे वाटते.

रस्त्यात गाय उभी असेल तर जाऊन तिला नमस्कार करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (पण हे तद्दन नादानपणाचे लक्षण आहे असे मला वाटते.) आपल्या इथे रस्त्यांच्या कडेला अनेक देव शेंदूर फासून बसवलेले असतात. जर का सगळे भक्त असे थांबून देवाचे दर्शन घ्यायला लागले तर काय गोंधळ उडेल याचा विचार करा.

पण त्याचवेळी रस्त्यातल्या गायींचा प्रश्न वाढला म्हणून दिसली गाय की घे सुरा आणि काप, भाज आणि खा... हा अतिरेक आहे. पण या दुसऱ्या पर्यायाचे इथे कोणी समर्थन केलेले दिसत नाही. चांगली गोष्ट आहे.

आज जसे वराहावताराचे पालन करून लोक अर्थार्जन करतात तसे गायींचे करायचे म्हणाले तर एकच गदारोळ होईल. पण दुर्दैवाने जगात सर्व प्रकारचे अन्न खाणारे लोक आहेत. आणि त्यावर कमाई करायची इच्छा कोणाला ना कोणाला तरी होणारच.

तसेच आज "हे विश्वची माझे घर" या न्यायाने भारतीय (आणि म्हणून हिंदू) जगभर पसरले आहेत. जन्मभर कोंबडीच्या अंड्याला सुद्धा न शिवलेले लोक झेक सारख्या देशात जात आहेत. आणि तेथे त्यांना जगण्यासाठी का होईना मांसाहार करावा लागतो. जे समोर येईल ते. मग त्यांनी जगण्यासाठी तरी का होईना गोमांस खाल्ले तर धर्मातून त्यांची हकालपट्टी करणार आहोत का? नाही. कारण आपल्या धर्मात ते नाही. आपला धर्म प्रगतिशील आहे आणि म्हणूनच इतकी सहस्त्रके टिकला आहे.

तसेच, झेक सारख्या देशात खाल्ले तर चालते, पण भारतात खायचे नाही... हे काय आहे? खाणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि मागणी तसा पुरवठा हा फार जुना नियम आहे.

याचा अर्थ सर्व हिंदूंनी मांसाहार/गोमांस खाणे सुरू करावे असा पण नाही. कारण प्रश्न श्रद्धेचा पण आहे. आणि प्रत्येकाच्या सीमा ज्याने त्याने ठरवायच्या असतात.

आज आपण भारतात राहून गोहत्या बंदी वगैरे करू. उपाहारगृहांतून गोमांसाची हकालपट्टी करू... पण हे वाचणाऱ्यातले निम्मे लोक परदेशात जाणार आहेत. आणि बहुतकरून त्याचा परदेशातला सहकर्मचारी जेवायच्या वेळेस गोमांस मागवणार आहे. मग काय कराल? जेवण सोडून निघून जाल? त्याही पुढे, हेच परदेशी लोक या ना त्या कारणाने भारतात पण येणार आहेत. एकदोन दिवस कौतुकाने भारतीय अन्न खातील, पण नंतर त्यांना त्यांचे नेहेमीचे अन्न लागणार आहे. त्यांत गोमांसाचा निश्चितच समावेश असणार. मग उपाहारगृहे पैसा कमावायची हि संधी सोडतील असे वाटते की काय? मुद्दा असा की या ना त्या कारणाने गोमांस तुमच्या शेजारच्याच्या ताटात दिसणार आहे. मग तुम्ही भारतात असा नाहीतर भारता बाहेर.

त्यामुळे हिंदूंनी दोन्ही बाजूने टोकाच्या भूमिका न घेता, मध्यम मार्ग स्वीकारायला हवा असे वाटते. आपल्या धर्मनिष्ठ आणि/अथवा विज्ञाननिष्ठ श्रद्धा बदलायची गरज नाही. पण गाय हा एक प्राणी आहे आणि जगातली ७/८ लोकसंख्या त्याकडे एक प्राणी आणि/अथवा म्हणूनच पाहते. आणि आपण स्वतः जरी गोहत्या आणि गोमांस भक्षण करणार नसलो तरी इतर लोक करणार आहेत आणि आपण ते थांबवू शकत नाही. कारण जसे आपण शेकडो वर्षे गायीची पुजा करत आहोत तसेच बाकीचे लोक गायीची पोटपूजा बांधत आहे.

काळ बदलला आहे. आपला दृष्टिकोन बदलायला हवा, नाहीतर आपल्यासाठी काळ थांबेल. हिंदू धर्माच्या श्रद्धा त्याच्या माणसांच्या प्रगतीसाठी अडसर न बनतील तर चांगलेच आहे, वाईट काही नाही. 

कश्याला देव मानायचे कश्याला नाही आणि कश्याला किती देवत्व द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हेच हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व आहे, हो ना?