कालच हा चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. परीक्षणाशी पुन्हा एकदा सहमत आहे. अप्रतिम चित्रपट. आंग ली हा एक महान दिग्दर्शक आहे याची खात्री पटली. शेवटच्या प्रसंगात दिलेली कलटी विस्मयकारक आहे. छायाचित्रण अत्यंत प्रेक्षणीय. विशेषतः चंदेरी प्रकाशाने तळपणारा निळा समुद्र, पाय त्यात हात बुडवून पाणी हलवतो आणि एक मासा वर उडी मारतो ते दृश्य पाहताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात. पाँडिचेरी आणि त्या विलक्षण बेटाचे चित्रणही अत्यंत सुंदर. इतका सुंदर निसर्ग ऍनिमेशनमध्येही पाहिल्याचे आठवत नाही. अर्थात छायाचित्रणाच्या जादूगिरीमुळे आंग लीचे दिग्दर्शनाचे श्रेय तसूभरही कमी होत नाही. एक मुलगा आणि वाघ या केवळ दोन कलाकारांच्या जोरावरही तीन चतुर्थांश चित्रपट बिलकुल कंटाळवाणा होत नाही.
योगायोगाने या चित्रपटासोबत ऑस्करच्या शर्यतीत असलेला जँगो अनचेन्ड हाही चित्रपट पाहता आला. मात्र त्या चित्रपटाने माझा पुरता भ्रमनिरास केला असे म्हणावे लागेल. मध्यंतरापर्यंत खिळवून ठेवणाऱ्या चित्रपटात मध्यंतरानंतर नेहमीची शिवीगाळ, मारधाड पद्धतीची टॅरेंटिनोबाजी केली आहे. अमेरिकेतील गुलामगिरीच्या पार्श्वभूमीवरील लिंकन हा अत्यंत सकस चित्रपट असताना त्याच्या तुलनेत टॅरेंटिनोची स्टायलिशगिरी फारच केविलवाणी वाटते. कॉलेजात असताना टॅरेंटिनो नावाचे केवढे मोठे वलय होते ते आठवले. पल्प फिक्शन, रिझर्वायर डॉग्ज, किल-बिल वगैरे चित्रपटांची अनेकजण पारायणे करत. इनग्लोरियस बास्टर्ड्स हाही कथेतील नावीन्य आणि वेगवान हाताळणी यामुळे उत्कंठावर्धक आणि प्रेक्षणीय झाला होता. त्या तुलनेत जँगो हा टॅरेंटिनो पद्धतीचा फारच क्लिशे वाटला.