आपल्याकडच्या झुंबरात काचेचे असंख्य लोलक असतात आणि असावेतही.. कायम सरधोपट एकाच लोलकातून बघणे कंटाळवाणे आणि एकसुरी ठरेल असे वाटते. वय, अनुभव आणि परिस्थितीनुरूप आपण एक लोलक खाली ठेवून दुसरा उचलून जगाकडे पाहावे असे वाटते. अर्थात बदलाला विरोध करणारे आपले मन घेतलेला लोलक क्षणभरदेखील खाली ठेवायला राजी नसतो ज्यामुळे हे 'असे का? ' सारखे प्रश्न पडत असावेत. रोजच्या गरजांसाठी व्यवसाय वा नोकरी करणे जसे गरजेचे तसेच कधी मूल होऊन पोराटोरांसोबत पतंगांची काटाकाटी खेळणेही जरूरीच की.. घरकोंबड्यासारखे घरीच बसून २४ तास संगणकावर टकटक करत एखादे काम करणे जसे गरजेचे तसेच कधी सायकलवर टांग टाकून उनाड इतस्ततः फिरणेही गरजेचेच.. हे असे जगावे.. कधी "तुम्ही पुणेरी का हो? " या प्रश्नाला "नाही हो.. मी तर तुमच्या नाशकाचाच की.. काय राव इतक्या दिवसांत ओळख नाही पटली का?! " असे उत्तर देऊन बघावे.. उगीचच!