माफ करा पण मला या धाग्याचा उद्देश ज्याप्रकारे समजवलाय तोच कळला नाही. "तुम्ही मराठीसाठी काय करता? " हा प्रश्न अगदी "तुम्ही आपल्या आईसाठी काय करता? " अशा धाटणीचा वाटला. अभिमानास्पद प्रत्येक गोष्ट इतरांसमोर 'फ्लाँट' केली तरच आपल्याला अभिमान आहे असे काही आहे का?

आपल्याला एखादी देवता आवडते म्हणून तिचे लॉकेट गळ्यात घालून हिंडायचे आणि मी कसा त्या देवतेचा परमभक्त आहे याचा डांगोरा पिटवून घ्यायचा की त्या देवतेच्या नक्की कुठल्या गोष्टी भावल्या ते समजून त्या अंगिकारायचा प्रयत्न करायचा? 

शिकण्याचे चार टप्पे असतात असं एकाने सांगितल्याचे स्मरते..
१. ती कला असते हेच माहिती नसते, अवगत वा पारंगत असण्याचा प्रश्नच येत नाही
२. ती कला आहे हे माहिती असते पण ती अवगत नसते. पारंगतता नसतेच.
३. ती कला माहिती असते, अवगत असते पण पारंगतता नसते
४. कलेत आपण इतके पारंगत असतो की ती आपल्याला येतेय ह्याचीच जाणीव गायब झालेली असते.

ही चौथी पायरी सर्वोच्च पदाची आहे जिची आस आपणा साऱ्यांना असली पाहिजे. बहुतेक जण तिसऱ्याच पायरीवर घुटमळत बसलेले दिसतात.. तिथून चौथ्या पायरीकडे जाण्याचा प्रयत्न करणे जास्त श्रेयस्कर आहे, आपण ३ऱ्या पायरीवर आहोत हे 'फ्लाँट' करण्यापेक्षा.