"ऐ नर्गिस-ए-मस्ताना, बस इतनी शिकायत है"
"हर राह पर टकराए, हर मोड पर घबराए" ह्याचे तुम्ही केलेले "मी दर पथात कचरलो - दर कोपऱ्यावर भ्यालो" पटत नाही. पहिली गोष्ट, ह्या वाक्याच्या सुरुवातीस 'तुम' अध्याहृत आहे हे दुसरी ओळ वाचून लक्षात येते. कवी स्वतः आपण काय केले ते सांगत नसून तिने काय केले ते सांगतोय. दुसरे म्हणजे 'टकराए'साठी 'कचरणे' का? 'टकराए' म्हणजे शब्दशः आपटणे नसले तरी समोरासमोर आलीस, भेटलीस असा काहीसा अर्थ घ्यायला हवा.
"हो जाते हो बरहम भी"चा अनुवादही बरोबर नाही, "बरहम" म्हणजे कोपलेली, राग आलेली, अप्रसन्न. (अस्ताव्यस्त असाही एक अर्थ आहे, पण तो इथे लागू नाही). ह्या ओळीचा अर्थ 'तू कधी क्रुद्ध होतेस, तर कधी मैत्रिणीसारखी वागतेस' असा आहे. त्याच्याशी तिच्या वागण्यातील विसंगती तो दाखवीत आहे.
"ऱ्हाले" खटकले. त्यापेक्षा 'उरले' चालले असते.
प्रत्येकसाठी हिंदीप्रमाणे मराठीतही 'हर' शब्द आहे, 'दर'ऐवजी तो चालला असता. किंबहुना, अर्थच्छटेचा विचार करता तो योग्य वाटतो. आपण दर वर्षी, दररोज इत्यादी म्हणत असलो तरी दर रंग, दर खुर्ची वगैरे सहसा म्हणत नाही. (काळ्या दगडावरची रेघ नसली तरी) हर म्हणजे प्रत्येक आणि दर म्हणजे प्रत्येकी असा सूक्ष्म फरक केलेला अनेकदा दिसतो.
"कयामत" साठी "कल्पान्त" शब्दशः बरोबर असला तरी कवितेत त्याचा अर्थ जीवघेणा असा आहे. अनुवाद त्या अर्थाने करायला हवा होता.
"आता नहीं बहलाना"साठी "रमणे असंभव झाले" नको, अर्थहानी होते. रूपगर्वितेस हृदयाच्या ठिकऱ्या करण्याची कला अवगत असली तरी रिझवणे, समजूत घालणे, चित्तवृत्ती प्रफुल्लित करणे येत नाही असे कवी म्हणतो.