चित्रपटाची प्रसिद्धी मला पुढील अर्थाने अभिप्रेत आहे.
समजा मी एक मराठी चित्रपट पाहीला, जो मला त्याच्या कथा, अभिनय, आशय, दिग्दर्शन ई. गोष्टींकरता अतिशय आवडला. पण हा चित्रपट मराठीत आहे, त्यामुळे ज्यांना मराठी येत नाही अशा बहुसंख्य लोकांना या सुंदर चित्रपटाबद्दल माहितीही नाही, आणि जोपर्यंत भारतातले बहुसंख्य लोक हा चित्रपट पाहत नाहीत, अथवा असा एखादा चित्रपट आहे हेही त्यांना माहित नाही, तोपर्यंत या सुंदर चित्रपटाला राष्ट्रीय प्रसिद्धी मिळणार नाही. मग या चित्रपटाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे हे माझे कर्तव्य ठरत नाही का?
या ठिकाणी मला 'प्रसिद्धी' चा अभिप्रेत अर्थ म्हणजे एखाद्या गुणहीन चित्रपटाची केलेली भलावण असा नसून, एखाद्या गुणी पण प्रादेशिक चित्रपटाला त्याचा हक्क असलेला सन्मान लाभावा याकरता त्याच्या अस्तित्वाची जमेल तेवढ्या लोकांना करुन दिलेली जाणीव असा आहे. 'श्वास' ला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा या घटनेची प्रसिद्धीमाध्यमांनी जेमतेम दखल घेतली. आता तर हा ऑस्करस्पर्धेला भारतातर्फे पाठवण्याकरता निवडला गेला आहे. असे असूनही, किती भारतीयांना 'श्वास' बद्दल माहिती आहे ? एखाद्या सामर्थ्यशाली मराठी माणसाने आपल्या सत्तेचा वापर किमान या घटनेची भारतभर जाहीरात करण्याकरता केला असता तर ?
याचकरता, 'श्वास' साठी निधीसंकलन किंवा मदतफेरी हा मला स्टंट वाटत नाही. ज्या चित्रपटामुळे उभ्या भारताला जागतिक सन्मान मिळू शकेल त्याकरता निधीसंकलन करण्यात काय गैर आहे ? आणि याप्रकारच्या सार्वजनिक मदतफेर्यांमुळे किमान लोकांना कळेल तरी की असा एक चित्रपट आहे. त्यांच्यात तो पहायची थोडी उत्सुकता तरी निर्माण होईल...