लॅचच्या बाबतीत माझ्या मित्राच्या आयुष्यात असा प्रसंग घडला की जमिन दुभंगून पोटात घेईल तर बरे असा विचार त्याच्या डोक्यात आला. परंतु, धरणी (स्त्रीलींगी असल्यामुळे) त्याला 'त्या' अवस्थेत स्विकारायला तयार झाली नाही.

झाले असे की, एके दिवशी माझ्या मित्राने ऑफिसला दांडी मारली. त्याची पत्नी ऑफीसला गेली होती. दिवसभर काय करावे म्हणून महाशय घर आवरत बसले. दुपारची वेळ आणि घरात कोणी नाही त्यामुळे साहेब अंगावर एकुलतेएक वस्त्र लेवून घरकामात गढले होते. बरीच आवराआवर झाल्यावर जमलेला कचरा दरवाज्या बाहेर ठेवावा म्हणून साहेब उठले. आपल्या अंगावर एकच वस्त्र आहे हे विसरून दरवाजा उघडून कचरा बाहेर ठेवत असता पाठीमागे वाऱ्याने दरवाजा बंद झाला. संपलं. जाम चडफडला. पण काय करतो. एका वस्त्रानीशी घरा बाहेर अडकला होता. बायकोला फोन करावा तर मोबाईल सुद्धा घरात होता. शेवटी, ज्यात कचरा बांधून टाकला होता ते वर्तमानपत्र झटकून मोकळं केलं आणि ते कमरेला अर्धवट धरून (कारण पूर्ण मावत नव्हतं) शेजारच्यांच्या घराची बेल दाबली. त्या घरातला पुरूष (माझ्या मित्राचा मित्र) कामावर गेला होता, मुलं शाळेत गेली होती. घरात बाई एकटीच होती. ह्याने बेल वाजवल्यावर तिने पीपहोल मधून बघीतलं. पण हा बाजूला लपून राहीला. तिने दाराची कडी काढल्याचा आवाज आल्यावर हा ओरडला 'वहिनी, बाहेर येऊ नका.' ती बाई पण घाबरली. तेंव्हा हा म्हणाला, 'माझ्या बायकोला फोन करून ताबडतोब घरी बोलवा. माझी किल्ली घरात राहून मी बाहेर अडकलो आहे.' त्या नंतर त्या बाईने तसा फोन करून याच्या बायकोला बोलावून घेतले. ती येई पर्यंत हा कॉरीडॉरच्या एका कोपऱ्यात, कमरेला वर्तमान पत्राचा तुकडा धरून, इतर कोणी येऊ नये म्हणून देवाचा धावा करीत उभा राहीला. देवाने त्याचा धावा ऐकला. लवकरच बायको किल्ली घेवून आली आणि साहेबांची सुटका झाली.