श्री. विनायक,
"श्वास"च्या निर्माता - दिग्दर्शकांना सत्यजित रे,अमोल पालेकर, सई परांजपे, विजया मेहता यांच्या मार्गाने न जावेसे वाटता आशुतोष गोवारीकर (लगान), संजय लीला भन्साळी (देवदास) यांच्या खर्चिक (तेही ऐपत नसताना ) मार्गाने जावेसे का वाटते हे मला कळत नाही.
ह्या तुमच्या श्रीनी ह्यांना पाठविलेल्या प्रतिक्रियेतील शेवटच्या परिच्छेदा बद्दल थोडेसे:
सत्यजित रे, अमोल पालेकर, सई परांजपे, विजया मेहता ह्यांनी उत्तमोत्तम कलाकृत्ती दिल्या आहेत ह्या बद्दल दुमत नाही. परंतु, सत्यजित रे वगळता बाकीच्या तिघांच्या कुठल्या कलाकृतींना 'सुवर्णकमळ'चा राष्ट्रीय सन्मान मिळाला ह्या बद्दल मी साशंक आहे. कदाचित ह्या क्षेत्रातील माझे ज्ञान तोकडे असेल. आपण माहीती पुरविल्यास माझ्या ज्ञानात भर पडेल.
आपल्या सर्वांना ह्या गोष्टीचा अभिमान वाटला पाहीजे की 'श्वास'चे निर्माते/दिग्दर्शक, आशुतोष गोवारीकर (लगान), संजय लीला भन्साळी (देवदास) ह्यांच्या मार्गाने जात नाहीएत. 'लगान' आणि 'देवदास' हे चित्रपट त्या-त्या निर्मात्यांनी स्वनिर्णयाने 'ऑस्कर' साठी पाठविले होते. 'श्वास'च्या निर्मात्यांनी/दिग्दर्शकानी 'तसं' केलं नाही. 'श्वास' हा चित्रपट फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 'ऑस्कर'साठी 'भारताची एंट्री' म्हणून पाठविला आहे. सत्यजित रे, आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी ह्यांचे कुठल्याही पारितोषिकांसाठी पाठविलेले चित्रपट त्यांच्या आयुष्यातले पहिलेच अपत्य नव्हते. (पहिल्या अपत्याचे कौतुक जरा जास्त असते). तसेच, ह्या निर्मात्यांपैकी कोण-कोण प्राप्तिकर बुडवून, राष्ट्राचे नुकसान करून गब्बर झालेले आहेत ह्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. 'श्वास' हा निर्मात्यांचा (त्यातही, चित्रपट निर्मिती हा ज्यांचा व्यवसाय नाही) आणि दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट आहे. आपआपसात पैसे जमवून, काढलेल्या आपल्या पहिल्याच चित्रपटाने, मोडकळीस आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीस, ५० वर्षांनंतर, पुन्हा एकदा गौरवास्पद सर्व्वोच्य राष्ट्रीय पुरस्कार, 'सुवर्णकमळ' मिळवून दिला आणि भारत सरकारच्यावतीने आपला चित्रपट 'ऑस्कर'साठी पाठविला जात आहे तर आपणही 'ऑस्कर' साठी प्रयत्न करावा असं निर्माता/दिग्दर्शकाना वाटणं नैसर्गिक आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नसता तर आपला चित्रपट ऑस्करसाठी पाठवायचा विचार 'श्वास'कर्त्यांनी (खर्च लक्षात घेता) स्वप्नातही कधी केला नसता.
'ऑस्कर'चे महत्व काय, गरज काय हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे. 'ऑस्कर' मिळाले किंवा नाही मिळाले म्हाणून 'श्वास'च्या दर्जात काही फरक पडणार नाही. पण, मिळाल्यास 'मराठी चित्रपटसृष्टी' साठी ती एक ऐतिहासिक घटना असेल. (चित्रपट जास्त व्यवसाय करील ते वेगळच.) ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांनी 'श्वास' ला मदत करावी असं माझं मत आहे.
धन्यवाद.