दारास 'लॉक' आहे काय?

आहे अशाचसाठी दारी तुझ्या उभा मी....
की आज ना उद्या ते उघडेल एक दिवशी!

दारापलीकडे जी/जो कोणी राहते/राहतो, 'ती'/'तो' दारास कुलूप लावून निघून गेलेली/ला आहे, आणि कवी (बहुधा 'ति'च्या/'त्या'च्या घरावर डाका घालण्याच्या उद्देशाने) आपल्याकडच्या असंख्य (चोर)किल्ल्यांपैकी एखाद्या तरी किल्लीने ते कुलूप (आणि पर्यायाने ते दार) आज ना उद्या उघडेल (आणि आपला उद्देश सफल होईल), या आशेने आपल्याजवळील जुडग्यातील एकएक किल्ली लावत बसलेला आहे, ही कल्पना रोचक आहे.

किंवा कदाचित असेही असू शकेल. दारापलीकडे राहणाऱ्या 'ति'ने/'त्या'ने, 'तुला वाटेल तेव्हा कधीही तू दार उघडून आत येऊ शकतोस' असे खुले आमंत्रण कवीस दिलेले आहे, आणि ते कवीस सहजसाध्य व्हावे, या उद्देशाने कवीस एक स्पेअर (मराठी?) किल्लीही देऊन ठेवलेली आहे. पण दुर्दैवाने आपल्या कविमहोदयांकडे अशा अनेक 'त्यां'नी दिलेल्या अनेक किल्ल्या आहेत, आणि कविमहोदय विसरभोळे आहेत. सबब, "या जुडग्यातील नेमकी कोणती किल्ली प्रस्तुत 'ति'ची/'त्या'ची?" असा पेचप्रसंग कविमहोदयांसमोर उभा ठाकलेला आहे, आणि "आज ना उद्या यातील एक तरी 'की' हे दार उघडेल" असा तर्क लढवून, कविमहोदय प्रयासप्रमादपद्धतीने एकएक किल्ली लावून पाहत आहेत. हीदेखील कल्पना रोचक आहे.

तेव्हा, यांपैकी कोणत्याही परिस्थितीत, "ते दार आज ना उद्या (आपोआप) उघडेल" या आशेवर निष्क्रियपणे वाट न पाहता (किंवा, पहिल्या परिस्थितीत, दारावर कुऱ्हाड चालवण्यासारखे अधिक आवाज करणारे आणि म्हणूनच अधिक लक्षवेधक, शिवाय अधिक विध्वंसक असे पर्याय वापरण्यापेक्षा) एकदा जवळच्या जुडग्यामधील एकएक किल्ली लावून पाहावी, ही सुचवण अतिशय उपयुक्त आहे, हे निर्विवाद.

परंतु मग त्या स्थितीत, अनुक्रमणिकेत ठळकपणे होणारे उल्लेख मराठीत असावेत या हेत्वर्थ, वरील प्रतिसादाचे शीर्षक (किमानपक्षी अनुक्रमणिकेत तरी) "दार उघडण्याआधी 'किल्ली' वापरल्यास जास्त बरे" असे नसावे काय? विशेषतः, 'की'करिता 'किल्ली' आणि 'चावी' असे एकाहून अधिक पर्यायी शब्द मराठीत नुसते प्रचलितच नव्हे, तर चांगले रुळलेले असताना त्यांपैकी कोणत्याही एकाचा वापर हा अधिक उचित वाटतो. सबब, या सूचनेचा जरूर विचार व्हावा. आगाऊ आभार.